मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत महापालिकेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. एकीकडे शिवसेना भाजप आणि काँग्रेस मुंबईत पालिका निवडणुकीसाठी कंबर कसलेली असताना राष्ट्रवादीने देखील विकासकामांचा धडाका सुरु केला आहे. सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सुनील पालवे यांच्या वडिलांच्या चौकाचं उद्घाटन सोहळा रंगला. समाजसेवक कारभारी विठ्ठल पालवे याचं मुंबईसाठी योगदान मोठं राहिलं आहे. विविध आंदोलनं आणि लढ्यात ते सहभागी झाले होते. आज त्यांच्याच आठवणींना उजाळा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.


मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्री नवाब मलिक यांच्याकडे मुंबई शहराचीही जबाबदारी होती पण ईडीच्या कारवाईने ते जेलमध्ये असल्याने नरेंद्र राणे आणि राखी जाधव यांच्यावर संयुक्त जबाबदारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अनुपस्थित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: जातीने मुंबईत पक्ष वाढवण्यासाठी लक्ष घालत आहेत. 



दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने याआधी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढली होती. तेव्हा राष्ट्रवादीने 122 जागा लढल्या होत्या. त्यापैकी 8 जागा जिंकण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं होते. महाविकास आघाडीतला मित्रपक्ष काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचाही राष्ट्रवादीचा विचार असल्याची चर्चा आहे.


मुंबई महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपुष्टात आला. त्यातच महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याने नियमानुसार प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 8 मार्चपासून मुंबईचा कारभार राज्य सरकारने नेमलेल्या प्रशासकाकडून पाहिला जात आहे. विशेष म्हणजे 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे. यापूर्वी 1 एप्रिल 1984 ते 15 एप्रिल 1985 या कालावधीत मुंबई महापालिकेत प्रशासक नेमण्यात आला होता.


मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
अभासे – 1
एकूण – 227
बहुमताचा आकडा – 114


संबंधित बातम्या :