मुंबई : नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले असून त्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार हा इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभारही महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव आणि नरेंद्र राणेंकडे सोपवण्यात आला आहे. राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 


नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी तात्पुरती इतरांकडे देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार त्यांच्या खात्याचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात येणार आहे. नवाब मलिक हे सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात येणार आहे. 


पक्षाची बैठक झाल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलंय. जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही पर्यायी व्यवस्था असेल. नवाब मलिक हे बिनखात्याचे मंत्री म्हणून राहतील. मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. 


पेनड्राईव्ह प्रकरणी खरे-खोटेपणा तपासल्यावर बोललं पाहिजे. फॉरेन्सिक अहवाल हाती आल्याशिवाय आणि सत्यता न तपासता लोकांपुढे मत मांडण हे चुकीचं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. 


नवाब मलिकांवरील आरोप काय आहेत?
नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची तीन एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी केवळ 55 लाख रुपये दिले होते. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.


महत्त्वाच्या बातम्या :