Shivsena BJP : हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील शाब्दिक चकमक वाढत चालली आहे. भाजप नेत्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वावर केलेल्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. महाराष्ट्रावर चालून येणाऱ्यांची बोटं छाटली जातील असा इशाराही त्यांनी दिला. 


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे हिंदुत्व हे त्वचेसारखं आहे. तर, शिवसेनेचे हिंदुत्व शालीसारखं असल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते कधीपासून हिंदू झाले हे तपासून पाहावं लागेल असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एमआयएमने शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत चर्चेची तयारी दाखवल्यानंतर भाजपने शिवसेनेवरील टीकेची धार आणखी तीव्र केली होती.


शिवसेनेच्या शत्रूंनी शिवचरित्रातील हा धडा घ्यावा: राऊत


छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणार आहे. शिवचरित्रातून आजही प्रेरणा मिळते. दिल्लीचं तख्त वापरून महाराष्ट्राला झुकवू असं कुणी समज करून घेऊ नये असेही राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला. शिवरायांना उद्धवस्त करण्यासाठी दिल्लीतून आक्रमणं झाली. काहींची बोटं छाटली गेली. औरंगजेबदेखील स्वराज्याविरोधात महाराष्ट्रात आला होता. मात्र, त्यालाही येथेच मृत्यू पत्करावा लागला. शिवचरित्रातील हा महत्त्वाचा धडा शिवसेनेच्या शत्रूंनी कायम लक्षात ठेवावा असेही राऊत यांनी म्हटले.  महाराष्ट्र शत्रूसमोर झुकणार नाही, महाराष्ट्र कायम लढत राहणार आणि आम्ही स्वाभिमानासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी लढत राहू असेही राऊत यांनी म्हटले. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ही हल्लाबोल


शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार, पदाधिकाऱ्यांना रविवारी संबोधित करताना भाजपवर टीका केली होती. शिवसेनचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आवाहनही उद्धव ठाकरेंने केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी मुस्लिमांना वगळता येणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून संघाला मुस्लिम संघ म्हणणार का, असा सवालही त्यांनी केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या: