Maharashtra Budget Session 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. गिरीश महाजन यांनी याबाबत हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेतं तेही पाहावं लागणार आहे.  तसंच काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या सभागृहात या अखेरच्या आठवड्यात तरी बोलणार का हा प्रश्न आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेलेल दोन आठवडे सभागृह डोक्यावर घेतलं होतं. त्यावर अद्याप मुख्यमंत्र्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


शिवसेना मेळाव्यात बोलणारे मुख्यमंत्री सभागृहात कधी बोलणार? 


काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात बोलले. यावेळी ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि पदाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यामुळं अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात ते सभागृहात बोलतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. 


अधिवेशनाच्या शेवटच्या 5 दिवसांत तरी विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सुटणार का?


आज पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या तिढ्याबाबत चर्चा होणार आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच सरकारनं आता नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा याविषयावर राज्यपालांची भेट घेतात का याकडे लक्ष लागून आहे. भाजपच्या गिरीश महाजनांची याबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका अर्ज दाखल झालाय. यावर काय निर्णय होतो याकडेही लक्ष लागलेले आहे.


निधी वाटपाबाबत नाराजी मुख्यमंत्र्यांनी दूर केली
विधानसभाध्यक्षपद आणि निधी वाटपाबाबत नाराजी होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी ती दूर केल्याचा दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदार राज्यपालांना भेटणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ती भेट थांबल्याचा दावा गोरंट्याल यांनी केलाय. तसंच निधीबाबत वरिष्ठांकडून हमी मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.