BJP Mission Mumbai : पाच पैकी चार राज्यात भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारलीय, त्यानंतर आता महाराष्ट्र भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक (Mission Mumbai muncipal elections) सुरू केलं आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मुंबईत जोरदार स्वागत झालं त्यावेळी फडणवीस यांनी मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याचा नारा दिला आहे. यूपी सह चार राज्यात भाजपने विजय मिळवल्यानंतर त्याचं जोरदार सेलिब्रेशन मुंबईत करण्यात आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्याचे प्रभारी होते आणि गोव्यातही (Goa elections 2022) भाजपनं चांगलं यश मिळवलं. हेच निमित्त करून आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत झालं. या स्वागताला मुंबई महापालिका निवडणुकीची किनार होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मिशन मुंबईची घोषणाही केली.



"...म्हणून भाजपने 2017 साली शिवसेनेचा महापौर होऊ दिला"


2017 च्या साली मुंबई महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना झाला. परंतु त्यावेळी राज्यात शिवसेना भाजपची युती होती. फक्त दोन जागांचा फरक या दोन्ही पक्षांमध्ये होता. तरीही भाजपने राज्यातील सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेचा महापौर होऊ दिला. पण यंदा मुंबई महापालिकेला 134 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाजपने 134 जागा जिंकण्याचं लक्ष ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपनं मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राळ उठवली आहे. आणि येणारी निवडणूक याच मुद्द्यावर लढवण्याचा भाजपचा भर आहे.


अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी


"विजयाने नम्र व्हायचं, विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी," असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विजयाने हुरळून न जाता खरी लढाई मुंबईत होणार असल्याचं सांगत त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. चार राज्यांच्या निवडणुकीचा निकालामधून संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू अनुभवली. मोदींनी सामान्य माणसांच्या मनात विश्वास निर्माण केला. तो विश्वास खऱ्या अर्थाने मतांच्या रुपात परिवर्तित झाला. गोव्यातील विजय हा मोदींचा आहे, आपल्या त्यात खारीचा वाटा आहे, असं फडणवीस म्हणाले.


मराठी मतांसोबत उत्तर भारतीय मतांची संख्याही मोठी
मुंबईत मराठी मतांसोबत उत्तर भारतीय मतांची संख्याही मोठी आहे. यूपीत भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळवल्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मते भाजपला मिळतील अशी अपेक्षा आहे.  शिवाय भाजपच्या मदतीला कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, संजय पांडे, विद्या ठाकूर यांच्यासारखे उत्तर भारतीय चेहरेही आहेत. एवढंच नाही तर योगी आदित्यनाथ ही मुंबईत प्रचाराला येऊ शकतात. या भाजपच्या जमेच्या बाजू असल्या तरीही यंदा राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे भाजपसाठी मुंबई महापालिकेची लढाई सोपी नसेल.


मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
अभासे – 1
एकूण – 227
बहुमताचा आकडा – 114


संबंधित बातम्या :


Devendra Fadnavis: मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून काढायचं काम आमचं आहे- फडणवीस


Kumar Ketkar: मविआ सरकार पाडण्यासाठी भाजप आता जोमाने प्रयत्न करेल - केतकर ABP Majha


Devendra Fadnavis: ...तर महाराष्ट्रात पर्यायी सरकार देऊ- फडणवीस ABP Majha