BMC chief Iqbal Singh Chahal Exclusive | मुंबईत पल्स पोलिओच्या धर्तीवर कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यासाठी पालिकेची तयारी- इक्बाल सिंह चहल
लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी लोकप्रतिनिधींशी चहल यांच्या यंत्रणेनं संपर्क साधला
मुंबई : देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईतही चित्र काहीसं वेगळं नाही. त्यातच मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवेल ही बाब खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बोलण्यातूनही अधोरेखित करण्यात आली. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना अतिशय सविस्तर स्वरुपात महत्त्वाची माहिती देत मुंबईकरांना कठीण परिस्थित धीर देऊ केला.
मुंबईतील कोरोना परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे, याबाबतची माहिती देताना इक्बाल सिंह चहल यांनी काही आकडेवारी सादर केली. ज्या धर्तीवर त्यांनी सध्याच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी गोंधळून जाण्याचं काहीही कारण नसल्याचं म्हटलं. मुंबईत 10 फेब्रुवारी ते 7 एप्रिल दरम्यानच्या काळात मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम दिसून आले असल्याचं सांगत या काळात 1 लाख 60 हजार कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये 1 लाख 36 हजार रुग्णांना लक्षणं नसल्याचंही निष्पन्न झालं. यापैकीसुद्धा अनेकांनीच रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिल्याचं म्हणत गरज नसल्याच चाचणी करु नका असं आवाहन त्यांनी केलं.
Mask Mandatory | वाहन चालवतेवेळी एकटं असतानाही मास्कचा वापर बंधनकारक; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
सध्याच्या घडीला मुंबईत 17 हजार बेड कोरोनाबाधितांसाठी रिक्त असून, यामध्ये 100हून अधिक बेड हे आयसीयू गटातील असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये वॉररुमची सुविधा करण्यात आली असून, त्यामध्ये आरोग्य यंत्रणाही सज्ज असल्याचं सांगत नागरिकांना यामध्ये कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
नागरिकांनो शिस्त पाळा...
नागरिकांना गरज नसल्याच कोरोना चाचणी आणि पॉझिटीव्ह अहवालासाठी आग्रही असू नये. नागरिकांकडून होणाऱ्या चुका अनेकदा त्यांच्या अडचणीत भर टाकतात. पण, आता येत्या काळात अतिरिक्त बेड उपलब्ध झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळणार असल्याची माहिती इक्बाल चहल यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाली.
मुंबईत लसीकरण केंद्र वाढवणार का?
मुंबईत आणि औरंगाबादमध्ये 115 लसीकरण केंद्र आहेत. याच धर्तीवर आता मुंबईत लसीकरण केंद्र वाढवणार का, या प्रश्नाचं उत्तर देत इक्बाल सिंह चहल म्हणाले, 'कमीत कमी, मुंबई दररोज 1 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात यावं असं आमचं लक्ष असणार आहे. सरासरी सध्या 50 ते 55 हजार इतक्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. पण, हे प्रमाण वाढवण्यावर आमचा भर असेल. त्यासाठी पालिकेनं 108 केंद्र सुरु केली आहे. औरंगाबादविषयी सांगावं तर, लोकसंख्या विखुरलेली असल्यामुळं तिथं लसीकरण केंद्र अधिक प्रमाणात सुरु केल्याचं दिसून येतं'. मुंबईत आतापर्यंत 14 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा, केंद्राने लवकरात लवकर लस द्यावी : महापौर किशोरी पेडणेकर
घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी मिळाल्यास, नागरिकांच्या घरोघरी जाऊन शंभर टक्के नागरिकांना लस देण्याचीही आमची तयारी असल्याचं म्हणत संबंधित यंत्रणेकडे त्यांनी परवानगी मागितली. सोबतच त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि मुंबईत त्याबाबतची उपलब्धता याबाबतही त्यांनी माहिती दिली. रेमडिसिवीर पुरवणाऱ्या कंपनीकडेही याचा तुटवडा असल्यामुळं ही अडचण जाणवू शकते असा इशारा देत मुंबईत सध्या ऑक्सिजनचा तुटवडा नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी स्पष्ट केली.
25 ते 45 वयोगटातील अनेकांना कोविडचा संसर्ग होत आहे असं म्हणत, जवळपास 20 टक्के रुग्ण हे या वयोगटातील आहेत. त्यामुळं या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात यावं, आणि या मोहिमेला व्यापक स्वरुप देण्यात यावं यासाठी ते आग्रही दिसले. पल्स पोलिओ मोहिेप्रमाणं हे स्वरुप व्यापक असावं असं ते म्हणाले.
पल्स पोलिओच्या धर्तीवर कोरोना लसीकरण मोहिमेची तयारी सुरु
लसीचा एकंदर पुवठा आणि नागरिकांची मानसिकता पाहता, पोलिओच्या धर्तीवर लसीकरण मोहीम कितपत शक्य आहे, असा प्रश्न विचारला असता इक्बाल सिंह चहल यांनी सकारात्मक उत्तर देत आपली यंत्रणा यासाठी कामालाही लागली असल्याची माहिती दिली. लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी लोकप्रतिनिधींशी चहल यांच्या यंत्रणेनं संपर्क साधला असून, येत्या काळात लोकसहभागातूनच ही मोहीम शक्य होईल असं हे म्हणाले.
'ब्रेक दि चेन'च्या आदेशांचं पालन करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासआठी गर्दी टाळावी लागेत. सोबतच गृह विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांनी काटेकोरपणे नियमांचं पालन करावं. 5 हून अधिक रुग्ण असणाऱ्या इमारतींना मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आलं आहे. मुंबईत अशा 680 इमारती आहेत. अशा इमारती सध्या पोलीस यंत्रणांच्याही मदतीनं सील करत इथून विषाणूचा संसर्ग आणखी पसरू न देण्यावर पालिका प्रशासन भर देत आहे, असं चहल म्हणाले. ज्या इमातरींमध्ये सध्या दोन किंवा तीन रुग्ण आढळत आहेत, त्यांनी सर्व नियम पाळावेत आणि हे संकट नियंत्रणात आणण्यात हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं.
कोरोनाची तिसरी लाट आली तर मुंबई सज्ज आहे का?
सध्याची रुग्णसंख्या पाहता हे आकडे सातत्यपूर्ण राहिले तर, एका टप्प्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल. असं असलं तरीही लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाची पुढची लाट टाळणं शक्य होईल असं आवाहन करत इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील कोरोना परिस्थिती सविस्तर स्वरुपात मांडली.