एक्स्प्लोर
Advertisement
1889 ते 2017... मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक वास्तूची 124 वर्षे!
आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मुंबई महापालिकेची भव्य ऐतिहासिक वास्तू आजही ताठ मानेनं उभी आहे आणि हीच वास्तू आज तिच्या 125 व्या वर्षात पदार्पण करते आहे.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मुंबई महापालिकेची भव्य ऐतिहासिक वास्तू आजही ताठ मानेनं उभी आहे आणि हीच वास्तू आज तिच्या 125 व्या वर्षात पदार्पण करते आहे.
महापालिकेची वास्तू म्हणजे ब्रिटिशांनी 124 वर्षांपूर्वी उभारलेला ऐतिहासिक ठेवा आहे. मुंबईची ओळख असणाऱ्या या वास्तूचा आजपर्यंतचा प्रवासही थक्क करणारा आहे.
सतत धावता रस्ता, वाहनं, माणसांची वर्दळ यात अखंड बुडालेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा हा परिसर. मात्र, दक्षिण मुंबईतल्या या भागात आल्यावर कुणाचंही लक्ष अगदी सहज वेधून घेतात, त्या इथल्या भव्य ऐतिहासिक इमारती.
इथे आल्यानंतर या वास्तूंमधला राजेशाही थाट आपलं लक्ष वेधून घेतो. या इमारती मुंबईच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासातल्या महत्वाच्या क्षणांच्या साक्षीदार आहेत.
124 वर्षे पूर्ण करुन शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारी ही मुंबई महापालिकेची इमारत आपल्याला याच इतिहासातलं बरंच काही सांगून जाते.
1889 ला या वास्तूच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि1893 ला म्हणजे अवघ्या चार वर्षात ही ऐतिहासिक वास्तू पूर्णही झाली. 124 वर्षांपूर्वी त्यावेळच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या जमिनीवर उभी असणारी मुंबई महापालिकेची इमारत ही पौर्वात्य आणि पाश्चिमात्य कलेच्या संगमाचा एक उत्तम नमुना आहे. एकीकडे इमारतीच्या उत्तर बाजूला असणारी शोभिवंत काचांची विशाल खिडकी, तिच्या बाजूला सिंहासनावरच्या मेघडंबरीसारखे कोरीव दगडी कोपरे, महापालिकेच्या बोधचिन्हाचा भाग असणारे सिंह, तर दक्षिणेकडे मुंबईचं ऐश्वर्य एका नजरेच्या टप्प्यात आणून देणारी विशाल गच्ची... या भव्य वास्तूकडे पाहिलं तर याचं बांधकाम केवळ 4 वर्षात पूर्ण झालंय हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही. या इमारतीच्या कंत्राटदाराने तेलुगू भाषिक कामाठी लोकांकडून हे काम अगदी दक्षतेनं, काटेकोरपणे आणि वेगानं करवून घेतलं.
या वास्तूची संकल्पना जरी ब्रिटिशांची असली तरी त्याचं कंत्राट एका भारतीयनेच घेतलं होतं. अंदाजे खर्चापेक्षा कमी खर्चात बांधून ही इमारत पूर्ण झाली. अंदाजे खर्च 11 लाख 88 हजार रुपये होता. मात्र, प्रत्यक्षात बांधकामासाठी 11 लाख 19 हजार रुपये खर्च आला.
या इमारतीच्या दगडी बांधकामावर बारकाईनं पाहिलं तर अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीही अगदी अलंकृतपणे त्यांच्या बारकाव्यांसह आपल्याला दिसतात. घुमट, कमानी त्यावरचे प्राणी, पाने यांच्या पोरबंदर लाईमस्टोन या प्रकारच्या खडकापासून बनलेल्या शिल्पाकृतींनी ही इमारत सजली आहे. या इमारतीच्या कमानी आणि खांबांमध्ये जांभा, पांढरा आणि निळा खडक वापरल्याचं दिसतं. विशेष म्हणजे 19 व्या शतकात इंग्लंडहून आयात केलेल्या मिंटन लाद्यांनी या इमारतीतील जमिनी सजवण्यात आल्या आणि या लाद्या अग्निरोधक होत्या.
इमारतीच्या आराखड्यातील महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इमारतीतील भव्य जिना आहे. हा जिना सेंट्रल हॉलपासून ते थेट वरच्या मजल्याला जोडतो. या जिन्याच्या बाजूलाच हायड्रॉलिक उद्वाहनाची व्यवस्था असून, उद्वाहनाच्या बाजूला 25 गॅलन इतकी क्षमता असणारी पाण्याची टाकी आहे. आग लागल्यानंतर आणीबाणीच्या परिस्थितीत वापर करता येण्यासाठी या पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
235 फूट उंचीचा मनोरा असलेल्या या इमारतीत महापौर, आयुक्त यांसोबतच अनेक अधिकारी आणि समित्यांची कार्यालये आहेत. 68 फुटांचे मोठे सभागृह आहे. या इमारतीच्या सभागृहातून मुंबईकरांच्या आयुष्याशी जोडलेले अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातात. गेली सव्वाशे वर्षे मुंबईचा नागरी कारभार हाकला जातो आहे. या इमारतीतला प्रशाकीय इतिहासही तितकाच थक्क करणारा आहे.
ब्रिटीशांनी मुंबईत पाय रोवल्यानंतर 1845 मध्ये स्वतंत्र म्युनिसिपल फंडाच्या माध्यमातून मुंबईतल्या नागरी सुविधांची पाहाणी झाली. 1858 ला तीन आयुक्तांची नेमणूक करुन मुंबईची व्यवस्था बघण्याची जबाबदारी देण्यात आली. 1872 ला करदात्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे कॉर्पोरेशन अस्तिवात आले. 1888 मध्ये महापालिका, स्थायी समिती आणि आयुक्त अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. 1922 ला करदात्यांसोबतच भाडेकरुंनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला. 1931 ला प्रथम नागरिकाचे अध्यक्ष हे नामाभिधान बदलुन महापौर असे करण्यात आले.
हा प्रवास फक्त एका इमारतीचा किंवा वास्तूचा नाही, तर या वास्तूसोबतच चालत, मिसळत आलेल्या संमिश्र संस्कृतींचाही आहे. सर्वांना आपलंस करणाऱ्या मुंबापुरीची ओळख असणारी ही वास्तू वर्षानुवर्षे इथल्या नागरी जीवनाचा गाडा हाकते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement