शिवसेनेचा सर्वात मोठा गड हिरावण्यासाठी भाजपचं 'मिशन मुंबई'
बिहारमध्ये सत्तेचं कमळ फुलवल्यानंतर शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महापालिकेवर झेंडा रोवण्यासाठी भाजपने रणनीती आखण्याचं निश्चित केलं आहे. आज मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे.

मुंबई : शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महानगरपालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी भाजपने मिशन मुंबईची आखणी केली आहे. बिहारमध्ये सत्तेचं कमळ फुलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने मुंबई महापालिका सर करण्यासाठी रणनीती आखण्याचं निश्चित केलं आहे. आज संध्याकाळी वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांची उपस्थितीत असेल. या बैठकीत कोणती रणनीती ठरते याकडे शिवसेनेसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष असेल.
बिहार विधानसभा निवडणुकीतील यशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपलं पूर्ण लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीवर केंद्रित केलं आहे. 2022 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. मात्र आतापासून मुंबई भाजपची टीम तयारीला लागली आहे. आज या संदर्भात मुंबई भाजप कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडत आहे.भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही बैठक असेल. या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रामुख्याने मतदारसंघाचे डिलिमिटेशन असो किंवा उमेदवार आयडेन्टिफाय करणं असेल किंवा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचा सामना करण्यासाठी कोणती रणनीती असली पाहिजे याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या माध्यामातून भाजप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून महापौर शिवसेनेचाच आहे. महापालिकेत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता होती, मात्र गेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेचे 92 तर भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले होते, मात्र राज्यातील सत्तेत एकत्र असल्याने भाजपने त्यावेळी शिवसेनेला ना विरोध ना पाठिंबा अशाप्रकारची भूमिका घेतली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावरही भाजपाने दावा केला नाही. परिणामी मुंबई महापालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे.
परंतु आता चित्र बदललं आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये दुरावा आला. शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार थाटला. उद्धव ठाकरे यांच्या रुपात राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आणि इतक्या जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेनेचा हा वार भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणजे मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
