मुंबईतील भाजपचे कार्यालय अनधिकृत! ते हटवून तिथं लतादीदींचं स्मारक बांधा: भीम आर्मी
Lata Mangeshkar Memorial Issue : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. या वादात आता भीम आर्मी (Bheem Army) नं उडी घेतली आहे.
Lata Mangeshkar Memorial Issue : भारतरत्न लता मंगेशकर यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. या वादात आता भीम आर्मी (Bheem Army) नं उडी घेतली आहे. मुंबईतील भाजपचे प्रदेश कार्यालयाच्या जागी लता मंगेशकर यांचं स्मारक बांधावं, अशी मागणी भीम आर्मीनं मुंबई पालिका महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहित केली आहे.
भीम आर्मीकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मुंबईतील भाजपचे प्रदेश कार्यालय हे अनाधिकृत असून ते तत्काळ हटवा आणि त्याठिकाणी भारतरत्न लता मंगेशकर यांचं स्मारक बांधा. भारतीय जनता पार्टीच्या या कार्यालयाबाबात आम्ही सातत्याने आवाज उठवून तक्रारी करुन देखील अद्याप कारवाई होत का नाही? असा सवाल देखील भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक बोलताना अशोक कांबळे म्हणाले की मुंबईत अनेक झोपड्यांवर कारवाई केली जाते मग भाजपाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई का करण्यात येत नाही. भाजपच्या अनधिकृत बांधकामाला पालिका संरक्षण तर देत नाही ना? असा सवालही त्यांनी केला आहे. भाजपनं अतिक्रमण करुन हे कार्यालय बांधलं आहे. हे कार्यालय हटवण्याची मागणी भीम आर्मीकडून केली आहे.
मागणी मान्य न झाल्यास मनपा कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा देखील भीम आर्मीनं दिला आहे. सातत्याने आवाज उठवून तक्रारी करुन देखील अद्याप कारवाई होत का नाही? असं देखील कांबळे यांनी म्हटलं आहे. गरीबांच्या झोपड्या अतिक्रमणाच्या जागी असतील तर त्या हटवल्या जातात.
संबंधित इतर बातम्या
शिवाजी पार्कवर लतादीदींचं स्मारक व्हावं ही आमची इच्छा नाही : पंडित हृदयनाथ मंगेशकर