Prasad Lad : दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी कशासाठी? प्रसाद लाड यांचा सवाल
प्रवीण दरेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला.
Prasad Lad : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. सध्या दरेकरांची चौकशी सुरु असून, ते सहकार्य करत आहेत. पोलिसांना आम्ही देखील सहकार्य करत आहोत. पण दोन ओळींच्या आरोपासाठी एवढी मोठी चौकशी कशासाठी असा सवालही प्रसाद लाड यांनी केला आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकरांची सुरु असलेल्या चौकशीमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी दरेकरांच्या समर्थनार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश आहे. मी प्रवीण दरेकर यांच्यासोबत आतमध्ये आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी असे आवाहन देखील प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
प्रवीण दरेकर हे पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत आहेत. मात्र, पोलिसांना माझी विनंती आहे की, दरेकरांना त्यांनी जास्त वेळ थांबवून कार्यकर्त्यांचा अंत पाहू नका असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिला आहे. दोन ओळींच्या आरोपासाठी प्रवीण दरेकरांची एवढी मोठी चौकशी कशासाठी असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन लाड यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
मुंबई बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. या चौकशीसाठी दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहे. यावेळी दरेकरांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.