किरीट सोमय्या यांना कोर्टाचा दणका; अब्रुनुकसानीच्या प्रकरणात कोर्टात हजर राहावं लागणार
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रविण कलमे आणि अर्थ नावाच्या एका संस्थेकडून आवाहन देण्यात आलं आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांविरोधात तक्रारी करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबईतील शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. किरीट सोमय्या यांनी 1 एप्रिल 2021 रोजी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी प्रवीण कलमे यांना गृहनिर्माण विभागाचा सचिन वाजे म्हणून संबोधलं होतं. या टिप्पणीवर प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा करत याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांना सुद्धा या सुनावणीदरम्यान हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे इतर नेत्यांच्या अडचणी वाढवणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याही अडचणी सध्या वाढल्या आहेत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए आणि म्हाडा या संस्थांमधून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते. हे काम प्रवीण कलमे यांना सोपवण्यात आले होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावले होते की त्यांनी मुंबई पोलीस दलाला दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते आणि ही जबाबदारी त्यांनी सचिन वाझेला सोपवली होती. ज्यामुळे सचिन वाजेचं नाव अधिक चर्चेत आलं होतं.
किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना प्रविण कलमे आणि अर्थ नावाच्या एका संस्थेकडून आवाहन देण्यात आलं आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाला याचिकेमध्ये तथ्य आढळले त्यामुळे कोर्टाने किरीट सोमय्या यांना 22 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कलमे यांनी सांगितलं की आता किरीट सोमय्या यांना आपले आरोप सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. किरीट सोमय्या यांनी आपले राजकारण चमकवण्यासाठी खोटे आरोप लावले आहेत. सोमय्या यांनी आता कोर्टापुढे आपले लावलेले आरोप सिद्ध करून दाखवण्याचं आवाहन सुद्धा प्रवीण कलमे यांनी दिलं आहे.
लोकांवर आरोप लावणारे किरीट सोमय्या हे आपल्या परिचितांचे अवैध बांधकाम वाचवण्यासाठी खोटे आरोप करत असल्याचं प्रवीण कलमे यांनी सांगितलं. मुंबईमध्ये अशा अनेक इमारती आहेत ज्या अनधिकृत आहेत. यावर आम्ही 68 आरटीआयद्वारे माहिती मिळवली आहे. इतकंच नाही तर यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केल्याचं प्रवीण कलमे यांनी या वेळी सांगितलं...
या प्रकरणात आता किरीट सोमय्या यांना पुढच्या सुनावणीच्या वेळेस शिवडी कोर्टात हजर राहावे लागणार आहे. मात्र यावर अद्याप किरीट सोमय्या यांची कुठलीही प्रतिक्रिया आली नसून त्यांचं पुढचं पाऊल काय असेल ते पाहणं महत्त्वाच असणार आहे.