Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसून कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना
महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना मज्जाव केला असताना देखील ते कोल्हापूरला रवाना झाले आहेत. किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्याठिकाणी होता. पोलिसांना त्यांना अडवलं. मात्र सोमय्यांनी पोलिसांना अडवू नका अशी विनंती केली. महालक्ष्मी एक्सप्रेसने किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी आहे, मग मला मुंबईत का अडवलं जात आहे. कोल्हापूरच्या सीमेवर मला अडवलं पाहिजे. हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. मला चार तास घरात डांबून का ठेवलं? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कोल्हापूरमध्ये जाऊन किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. मात्र ही पोलीस तक्रार होऊ नये यासाठी मला अडवलं जात आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मज्जाव
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सर्व पोलिस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता उद्याचा दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती केली आहे.
किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे वातावरण विस्कळीत होत आहे- शंभूराजे देसाई
किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यामुळे वातावरण विस्कळीत होत आहे. चुकीच्या पद्धतीने ते वेगवेगळ्या नेत्यांवर ते आरोप करत आहेत. सध्या गणेशोत्सवाचा काळ आहे. पोलीस यंत्रणा आणि इतर यंत्रणा ही त्यात गुंतलेली आहे. अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.