(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कंगना रनौतच्या पाठी लपून भाजपवर वार करू नये; आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना टोला
कंगना रनौत हिच्या वक्तव्याचा भाजपशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण भाजप नेते आशिष शेलार यांनी दिले आहे. तर कंगनाच्या पाठी लपून संजय राऊत यांनी वार न करण्याची खोचक टीका शेलार यांनी केलीय.
मुंबई : नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत असणारी कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेमध्ये आली आहे. याच वक्तव्यामुळे आता राजकारणही पेटलं आहे. कंगना रनौतने केलेल्या वक्तव्यांचा भाजपशी संबंध नसल्याचं आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तर कंगना रनौतच्या पाठी लपून भाजपवर वार न करण्याची खोचक टीका सुद्धा आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केली. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून कंगना वारंवार सोशल मीडिया वरुन वादग्रस्त विधानं करत आहेत. नुकत्याच केलेल्या विधानांमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली असून मुंबई पोलिसांवर ही शाब्दिक हल्ला चढवला आहे. या विरोधातून सर्व स्तरातून कंगना विरोधात संताप उसळत आहे.
तर कंगनाने मुंबईमध्ये न राहण्याचा सल्ला सुद्धा अनेकांनी दिला आणि याच्यावर संताप व्यक्त करत कंगनाने ट्विटरद्वारे मी 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आणि माझ्या येण्याची वेळ सुद्धा कळवणार असून ज्यांच्या मध्ये मला रोखण्याची हिम्मत असेल त्यांनी मला रोखून दाखवण्याच चॅलेंज देखील केलं आहे.
मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच... कंगनाच्या ट्वीटला संजय राऊत यांचं उत्तर
संजय राऊत यांनी कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेत मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे. कंगना ही मुंबईत राहिली तिने पैसा कमावला नाव कमावलं. मुंबई पोलिसांनी तिला वेळोवेळी संरक्षणही दिलं. मात्र, तरीही मुंबई पोलिसांवर अशाप्रकारे टीका करणं दुर्दैवी आहे. कंगनाला हिमाचल पोलीस मुंबईत येऊन संरक्षण देणार नाही. त्यामुळे तिने हिमाचलमध्येच राहण्याचा शाब्दिक प्रहार संजय राऊत यांनी केला. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा कंगनाला मुंबईमध्ये राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत तिच्या वक्तव्याचा निषेध केला.
कंगनाच्या पाठी लपून भाजपवर वार करू नये : आशिष शेलार मात्र, भाजपकडून स्पष्टीकरण देत कंगनाच्या विधानांचा पक्षाशी संबंध नाही आणि समर्थनही नसल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. तर संजय राऊत यांनी कंगनाच्या पाठी लपून भाजपवर वार करू नये, अशी खोचक टीका सुध्दा केली. तर सुशांत प्रकरणाला घेऊन काही राजकीय नेते नवीन वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते बंद करण्याचा सल्ला सुद्धा अशिष शेलार यांनी दिला आहे.
Anil Deshmukh On Kangana | कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख