सुशांतसिंग प्रकरणावर भाजपने एक निवडणूक काढली, अजूनही सीबीआयचा रिपोर्ट नाही : भाई जगताप
सुशांतसिंग प्रकरणावर भाजपने एक निवडणूक काढली, अजूनही सीबीआयचा रिपोर्ट नाही, त्यामुळे वाझे प्रकरणात तरी मुळापर्यंत जा, भाई जगताप यांचा भाजपला सल्ला.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात भाजपने प्रचंड आरडाओरडा केला. हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देखील दिला. परंतु, त्याचा रिपोर्ट अद्याप सर्वसामान्यांसमोर आला नाही. भाजपने सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणावर एक संपूर्ण निवडणूक काढली. त्यामुळे सचिन वाझे प्रकरणात तरी भाजपने मुळापर्यत जावं असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपला दिला आहे. 'एबीपी माझा'ने सचिन वाझे यांना एनआयएने 13 तासांच्या चौकशी नंतर अटक केली याबाबत काँग्रेसची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला त्यावेळी भाई जगताप बोलत होते.
सुशांत सिंग प्रकरणात पुढं काय झालं? हे अद्याप देशवासीयांना माहिती नाही. सध्या केंद्रीय यंत्रणा सचिन वाझे या प्रकरणात उतरल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वास येत आहे. माझं मत आहे पोलीस यंत्रणेला त्यांचं काम करून द्यावं. कारण की हा संपूर्ण विषय खूप संवेदनशील आहे. राज्यातील विविध घडामोडींमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना किंवा पोलिसांना मोकळीक देण्यात यावी. नुकतंच खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, राज्यात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये तथ्य आहे कारण सरकार गठीत झाल्यापासून विविध प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सरकार कोसळेल असं वक्तव्य केलं त्यामुळे ते कशाच्या आधारावर बोलत आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे.
राज्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रकरणात सरकार अस्थिर कसं होईल याचा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु, मला खात्री आहे अशा संकटांना देखील आमचं सरकार तोंड देईल. नाना पटोले यांची चौकशी एनआयएने करावी अशी मागणी सामनातील रोखठोक सदरामध्ये संजय राऊत यांनी केली आहे. या प्रश्नाला उत्तर देताना भाई जगताप म्हणाले की, नाना पटोले हे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी जर एखाद्या गोष्टीची मागणी केली असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी असेल. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्याचं काहीच कारण नाही. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी या संपूर्ण प्रकरणी सचिन वाझे नार्कोटेस्ट करावी अशी मागणी केली आहे? या प्रश्नाला उत्तर देताना भाई जगताप म्हणाले की, राम कदम यांच्या मागणीला काहीच अर्थ नाही. राम कदम कोण आहेत? त्यांच्यावर काय भाषा करायचं. सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबत प्रतिक्रिया देताना भाई जगताप म्हणाले, सुधीर मुनगंटीवार भविष्यवाणी करत आहेत याबाबत जनतेच्या मनात आता संशय आहे. राज्यात जे काही प्रकार घडत आहेत याबाबत वारंवार सरकार अस्थिर करण्यासाठी आकांडतांडव करायचं असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय असो किंवा एनआयए असो यांचा जो रिपोर्ट आहे. तो आता समोर आणावा.