Bird flu Outbreak : पालघरमध्ये कोरोनासोबत बर्ड फ्लू फोफावण्याची स्थिती, बर्ड फ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
गेल्या तीन दिवसांपासून पालघर शहरात असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रात लागोपाठ कोंबड्यांचा अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तीन दिवसांत 45 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता.
पालघर : पालघरमध्ये कोरोना बरोबर बर्ड फ्लूच्या रूपाने दुसरं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून पालघर शहरातील सूर्या कॉलनीजवळ असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रातील संशयास्पद मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या कोबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूची लागण झाल्याने झाल्याचं स्पष्ट झाले आहे. अचानक या कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली होती. मात्र आता बर्ड फ्लू असल्याचे सिद्ध झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पालघर शहरात असलेल्या शासकीय कुक्कुटपालन केंद्रात लागोपाठ कोंबड्यांचा अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तीन दिवसांत 45 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांचा अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे त्यांचे अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. हे अहवाल सकारात्मक आले असून या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालघरमधील या कुक्कुटपालन केंद्रात 550 हून अधिक कोंबड्या आहेत. मात्र आता हे अहवाल सकारात्मक आल्यामुळे कुक्कुटपालन केंद्रातील इतर जिवंत कोंबड्यांची नियमानुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तर एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्मवरही निर्बंध लावण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले आहे.
बर्ड फ्लूचं संकट घोंघावत असताना राज्यात पशु संवर्धन विकास अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता
बर्ड फ्लू हवेतून पसरणारा संसर्गजन्य रोग असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात स्थापन केलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत इतर कुक्कुटपालन केंद्रांमध्ये व चिकन विक्री दुकानांमध्ये तपासणी करून खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासना कडून देण्यात येत आहे.