मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर-भोंग्यांवर बंदी
Mumbai Police On Loudspeaker: मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे.
Mumbai Police On Loudspeaker: मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.
काय आहेत मुंबई पोलिसांचे निर्देश?
सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवण्याची परवानगी नसले. जर कोणीही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याचा अर्थ धार्मिक स्थळ असो किंवा कोणताही खासगी कार्यक्रम असतो, असं केल्यास कारवाई करण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम ही तयार केली आहे. कंट्रोल रूमला जर कॉल आला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.
याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी आदी कामात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयपीसी कलम 144, 149 आणि 151 इत्यादी अंतर्गत समाजविघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा विचार केला जात आहे. काही लोकांना आधीच यासंबंधित नोटीस बजावण्यात आली आहे.
या नियमांची होणार अंमलबाजवणी
- अनेक मशिदी आणि मंदिरे कायदेशीररित्या बांधली गेली आहेत, परंतु जी बेकायदेशीर आहेत किंवा सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, त्यांना लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही.
- मंदिर आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देताना, मुंबई पोलीस रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन होत असल्याचे सुनिश्चित करणार आहे.
- ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत, त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी असेल. यासोबतच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की, नाही हेही पाहिलं जाणार आहे.
सरकारने लाऊडस्पीकरबाबत 2015 मध्ये जाहीर केला होता जीआर
राज्य सरकारने 2015 साली लाऊडस्पीकरबाबत जीआर जाहीर केला होता. या जीआरनुसार, रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई असेल (प्रेक्षागृह, कॉन्फरन्स रूम, कम्युनिटी हॉल आणि बँक्वेट हॉल वगळता). कोणत्याही धार्मिक सणाच्या वेळी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात विशेषत: 10 ते 12 दरम्यान लाऊडस्पीकरला केवळ राज्य सरकार परवानगी देऊ शकते. मात्र तीही केवळ 15 दिवसांसाठी. नियम 2000 च्या कलम 8 नुसार ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होत असल्यास 100 नंबर डायल करून त्याची तक्रार करता येईल. नाव न सांगताही तक्रार नोंदवता येणार असून त्यावर कारवाई देखील करण्यात येईल.