Bhiwandi Fire: भिवंडीत अग्नीतांडव! चार मजली इमारत आगीत खाक होऊन कोसळली, 10-12 किमी धुराचे काळे लोट
घटनास्थळी अजूनही धुराचे लोट उठत असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे.

Bhivandi Fire: ठाण्यात भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वागत कंपाउंडमधील फर्निचर गोदामाच्या चार मजली इमारतीला पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीत मोठ्या प्रमाणावर प्लायवूड, रेग्झिन, फोम आणि सोल्युशनचा साठा असल्याने आग अत्यंत वेगाने पसरली आणि संपूर्ण इमारत काही तासांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना अनेक आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक आगीच्या भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत घडली आहे. यात स्वागत कंपाउंड मधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. यात चार मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. (Bhiwandi Fire Building Collapse)
धुराचे काळे लोट, आग आटोक्यात आणणे कठीण
ही आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळा सुमारे 10 किलोमीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसत होत्या. घटनेची माहिती मिळताच भिवंडीतील दोन, तर कल्याण आणि ठाणे येथून प्रत्येकी एक अशा एकूण चार अग्निशामक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र गोदामात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग आटोक्यात आणणे कठीण जात आहे.
चार मजली इमारत कोसळली
या दुर्घटनेत 12 गोदामे पूर्णपणे आगीत खाक झाली असून इमारतीचा बराचसा भाग कोसळून पडला आहे. या आगीच्या भीतीने नजीकच्या गोदामातील माल सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कामगारांनी धावपळ सुरू झाली होती तर शेजारी असलेल्या इमारती मधील सर्व कुटुंबीय आपल्याकडील मौल्यवान साहित्य घेऊन बाहेर सुरक्षितस्थळी पोहचले होते.सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग विझवण्याच्या प्रयत्नात हरिश्चंद्र वाघ या अग्निशमन दलाच्या जवानाला किरकोळ जखमा झाल्या असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अजूनही धुराचे लोट उठत असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या भागात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने आणि आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने तिला पूर्णपणे विझवण्यासाठी किमान 12 तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा:
Bhiwandi: भिवंडीत अग्नितांडव! फर्निचरच्या गोदामाला भीषण आग; 7 ते 8 गोदाम आगीच्या भक्षस्थानी























