(Source: Poll of Polls)
नक्षल कनेक्शन : गौतम नवलखा यांना हायकोर्टाचा दिलासा कायम
नवलखा यांना 18 फेब्रुवारीपर्यंत अटक करु नये, असे आदेश हायकोर्टाने पुणे पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याबाबत मानवाधिकार कार्यकर्ते पत्रकार गौतम नवलखा यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.यावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे.
नवलखा यांना 18 फेब्रुवारीपर्यंत अटक करु नये, असे आदेश हायकोर्टाने पुणे पोलिसांना दिले आहेत. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचारातील नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन नवलखा यांच्यासह तेलगू लेखक वरवरा राव, सामाजिक कार्यकर्ते अरुण परेरा, वर्नोन गोन्सालविस आणि सुधा भारद्वाज, प्राचार्य आनंद तेलतुंबाडे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद पार पडली होती. या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवले होते, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकांनी देशभरात विविध ठिकाणी छापे मारले. अटक केलेले सर्वजण नक्षलवाद्यांसाठी शहरी भागात थिंक टँक म्हणून काम करत होते, असा पोलिसांचा आरोप आहे


















