Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, 22 विनाआरक्षित डबे, रेल्वे पोलिसांचं क्राऊड मॅनेजमेंट फेल
bandra gorakhpur antyodaya express Stampede: वांद्रे-गोरखपूर अंतोदय एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी. या एक्स्प्रेस ट्रेनचे 22 डबे अनारक्षित होते
मुंबई: उत्तर भारताकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या सुटणाऱ्या मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर (Bandra Terminus Stampede) रविवारी पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळपासून या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचे (Railway Police) नियोजन कारणीभूत असल्याची चर्चा आहे. रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन नीट न करता आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनसवर पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. वांद्रे ते गोरखपुरसाठीची 22921 अंत्योदय एक्सप्रेस फलाट क्रमांक 1 वर आल्यानंतर हा प्रकार घडला. ही गाडी स्थानकात येत असतानाच काही प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी सामान घेऊन गाडीत चढायला सुरुवात केली. या एक्स्प्रेस ट्रेनचे 22 डबे अनारक्षित होते. त्यामुळे या गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. याचे पर्यवसन चेंगराचेंगरीत होऊन अनेक प्रवासी जखमी झाले.
ही घटना पहाटे घडल्यामुळे बराचवेळ याबद्दलची माहिती समोर आली नाही. मात्र, सकाळी ही बातमी पसरल्यानंतर अनेकांनी वांद्रे टर्मिनसच्या दिशेने धाव घेतली. यावेळी एक नंबर प्लॅटफॉर्मवरील रेल्वे ट्रॅकवर चपलांचा खच पडल्याचा दिसत होते. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच रेल्वेकडून तातडीने या चपला हटवण्यात आल्या.
दुर्घटनेला रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत?
या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर बराच काळ याबद्दलची माहिती बाहेर आली नाही. व्हिडीओ समोर आल्यानंतर ही घटना समोर आली तेव्हा वांद्रे-गोरखपूर ट्रेन ही वांद्रे टर्मिनसवरुन निघाली होती. रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन न करता आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. मात्र, रेल्वे विभागाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
अंत्योदय एक्स्प्रेस यार्डातून वांद्रे टर्मिनसवर आली तेव्हा त्याठिकाणी आरपीएफ, जीआरपी आणि होमगार्डचे मिळून 50 ते 60 कर्मचारी फलाटावर तैनात होते. चेंगराचेंगरी झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्ट्रेचर आणि खांद्यावरुन उचलून जखमींना रुग्णालयात नेले. जखमींपैकी बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दिवाळी आणि छटच्या सणासाठी उत्तर भारतातील अनेकजण आपल्या गावी जातात. त्यामुळे 22 अनारक्षित डबे असूनही प्रवाशांची प्रचंड गर्दी होती, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
#WATCH | Maharashtra | Visulas from Bandra Terminus where 9 people have been injured in a stampede due to a rush on platform number 1 of the Terminus Injured passengers have been shifted to a hospital: BMC pic.twitter.com/PccL3kjhp2
— ANI (@ANI) October 27, 2024
आणखी वाचा
मोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, दोघांची प्रकृती गंभीर