मोठी बातमी! बाबा सिद्दिकींच्या पोलीस सुरक्षा रक्षकाचं निलंबन; तर फटाक्याच्या धुराचा फायादा मारेकऱ्यांनी घेतला, कॉन्स्टेबलचा दावा
Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Baba Siddique Case: राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी बाबा सिद्दिकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक चौकशीत बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कॉन्स्टेबलकडून चूक झाल्याचं निष्पन्न झाल्यानं कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कॉन्स्टेबल शाम सोनावणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी गोळीबार केल्याचा दावा कॉन्स्टेबल सोनावणे यांनी केला आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती.
गोळीबार होत असताना पोलीस सुरक्षारक्षक काय करत होता? झिशान सिद्दिकींचा सवाल
झिशान सिद्गीकी यांनी गेल्या दोन दिवसांत पोलिसांची भेट घेतली होती. या घटनेचे राजकारण करु नका. आम्हाला न्याय हवा, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले होते. आपल्या वडिलांवर गोळीबार होत असताना पोलीस सुरक्षारक्षक काय करत होता, त्याला काहीच कसे करता आले नाही, असा सवाल झिशान यांनीही उपस्थित केला. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सविस्तर जबाब नोंदवला जाणार आहे.
मला न्याय हवाय : झिशान सिद्दिकी
बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर बाबा सिद्दिकींचा मुलगा झिशान सिद्दिकी यानं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत एक निवेदन जारी केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, "माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांच्या जीवनाचं आणि त्यांच्या घरांचं रक्षण करताना आपले प्राण गमावले. आज माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे."
मुंबई पोलिसांकडून आणखी पाच जणांना अटक
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या नऊ झाली आहे.
मुंबई पोलीस अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेनं शेजारच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जत येथे छापे टाकले. त्यानंतर या पाच जणांना गुन्ह्याशी संबंधित कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.