कल्याण उपशहर प्रमुखावर हल्ला, शिंदे समर्थक माजी नगरसेवकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप
Kalyan News : कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज हल्ला झाला. शिंदे समर्थक माजी नगरसेवकाच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप पालांडे यांनी केला. मात्र महेश गायकवाड यांनी हे आरोप फेटाळले.
Kalyan News :कल्याण (Kalyan) उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे (Harshwardhan Palande) यांच्यावर आज (20 जुलै) सकाळच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी तलवार, रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हर्षवर्धन पालांडे हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक असून त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर महेश गायकवाड यांनी मात्र आरोपांचं खंडन करत हल्ला झाला हे दुर्दैवी आहे. मात्र माझा काडीमात्र संबंध नाही. पोलिसांनी तपास करत कारवाई करावी. माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करु, असा इशारा दिला आहे. दरम्यान घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.
एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा तिसरा अंक सुरु झाला असतानाच आता हा संघर्ष रक्तरंजित होत असल्याचं दिसून येतं आहे. अनेक ठिकाणी शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक आपापसात भिडल्याच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील संतोषी माता रोड परिसरात कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तीन ते चार जणांनी तलवार आणि रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. "सकाळी कामावर जात असताना अचानक तीन ते चार इसमाने आपली गाडी अडवली आणि तलवार, रॉडने हल्ला केला, असं पालांडे यांनी सांगितलं. हल्लेखोर शिवसेनेत जास्त उडतोस, असं म्हणत धमकावल्याचा आरोप देखील पालांडे यांनी केला. हे हल्लेखोर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे साथीदार असून शिवसेनेत काम करतात, असा आरोप पालांडे यांनी केला आहे.
तर महेश गायकवाड यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. हल्ला झाला हे दुर्दैवी आहे. मात्र माझा काडीमात्र संबंध नाही. पोलिसांनी तपास करत कारवाई करावी. माझ्यावर खोटे आरोप करत बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे कल्याण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.