भिवंडीतील सावकारांचा आदिवासी बांधवांवर अत्याचार, सावकारी पाशातून सुटका करण्याची पीडितांची मागणी
पिळंझे येथील चिंचपाडा या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या गावात सावकार म्हणून वावरणाऱ्या राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील या दोघांच्या दहशतीखाली राहत आहेत.
भिवंडी : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली मात्र अजूनही सावकारांच्या जाळ्यात अनेकजण अडकल्याची घटना समोर आली आहे. भिवंडी शहरापासून साधारणतः 10-12 किलोमीटर दूर असलेल्या पिळंझे गावातील चिंचपाडा या आदिवासी पाड्यतील ही घटना आहे. आदिवासी वेठबिगार महिलेवर सावकाराने जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर देशासह राज्यातील आदिवासी बांधवांवर स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही होणाऱ्या अन्यायाची दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे.
आदिवासी महिलेवर अत्याचार तसेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर मागील दोन दिवसांपूर्वीच भिवंडी तहसीलदारांनी या आदिवासी पाड्यातील अठरा कुटुंबियांची सावकारी पाशातून मुक्तता करून तसे प्रमाणपत्र देखील या आदिवासी बांधवांना दिली आहेत. मात्र यासारखे अनेक आदिवासी बांधव अजूनही सावकारी पाशात अडकले आहेत. मात्र केवळ गुन्हा दाखल झाला म्हणून किंवा सावकारी पाशातून मुक्तता झाल्याची प्रमाणपत्र मिळालं म्हणून वर्षानुवर्षे आदिवासी बांधव व महिलांवर होणारा अन्याय आजही कमी होत नाही. तसेच आदिवासी बांधवांची खऱ्या अर्थाने सावकारी पाशातून मुक्तता होतांना दिसत नाही. किंबहुना सत्ताधाऱ्यांकडूनही तसे प्रयत्न होत नाहीत. हेच या आदिवासी बांधवांचे दुर्दैव आहे. महिलेवर अत्याचार झालेल्या व वेठबिगारीतून मुक्तता झालेल्या पिळंझे गावातील आदिवासी पाड्यावर जाऊन येथील परिस्थिती जाणून घेतली असता त्यांच्या मनात सावकाराने केलेल्या अत्याचार व त्याची दहशत स्पष्ट दिसून येत होती.
भिवंडी-वाडा महामार्गावर असलेल्या अनगाव पिळंझे येथील चिंचपाडा या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव या गावात सावकार म्हणून वावरणाऱ्या राजाराम काथोड पाटील व चंद्रकांत काथोड पाटील या दोघांच्या दहशतीखाली राहत आहेत. महिलांचा शारीरिक व मानसिक छळ तर पुरुषांना तुटपंज्या वेतनावर राबवून त्यांना मारहाण करणे हा या दोन्ही सावकारी भावांचा नित्यनियम होता. मजुरांनी काम किंवा म्हणणे ऐकले नाही तर त्यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करणे व सतत दडपणाखाली ठेवणे असे अत्याचार या सावकारांकडून होत होते. आपल्या शेतात, गोठ्यात, घरात, वीटभट्टीवर तसेच खदाणीत तुटपुंज्या पगारावर या आदिवासी बांधवांना राबवून या दोन्ही सावकारांनी या आदिवासी पाड्यावर कमालीची दहशत बनवली आहे.
आदिवासी पती पत्नी दोघा मजुरांना आठवड्याला केवळ पाचशे रुपये वेतन देऊन त्यांच्याकडून सतत काम करून घेतले जात होते. सकाळी सात ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत हे मजूर याठिकाणी सावकारांकडे राबत असत. जर तब्येत बरी नसली किंवा इतर अडचणींमुळे एखादा दिवस कामावर गेले नाही तर थेट दीडशे ते दोनशे रुपये कपात करून हे सावकार या आदिवासी मजुरांना केवळ तीनशे ते चारशे रुपयेच आठवड्याची दोन माणसांची मजुरी देत. सतत मारहाण व दडपण याची वाच्यता कुठे काढली तर मारहाण होत असल्याने हे नागरिक सहसा कुणाकडे आपल्यावर होणारा अन्याय व्यक्त करत नाही. तर दुसरीकडे पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस देखील त्यांचे ऐकत नाही. त्यामुळे या आदिवासी बांधवांवर सावकाराची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हे आदिवासी बांधव आजही सोयी सुविधांपासून वंचित आहेत. छोटीशी झोपडी बांधून त्यात कोणतेही सुखसुविधा नसून निवाऱ्यापुरती जागा मिळवून हे आदिवासी बांधव राहत आहेत. महिलांवर झालेल्या अन्यायानंतर तहसीलदारांनी सावकारी पाशातून 18 आदिवासी कुटुंबाची सुटका केली खरी मात्र आता त्यांच्या समोर उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शासनाने जशी सावकारी पाशातून आमची सुटका केली तशीच आमच्या उदरनिर्वाहासाठी देखील शासनाने पुढाकार घ्यावा व आमच्यावर अन्याय करणाऱ्या दोघा सावकारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आदिवासी बांधव व महिला आता करत आहेत. सध्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही सावकार आरोपी फरार आहेत.
विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीची प्रतिक्रिया
आईचे चार वर्षांपूर्वी निधन झाले त्यावेळी राजाराम पाटील याने जबरदस्तीने चार वर्षांपूर्वी पाच हजार रुपये दिले होते. त्यानंतर तीन वर्षे घरातील भांडी पाणी व त्यांच्या घरातील इतर कामे करत होते. तर एक वर्ष वीटभट्टीवर देखील काम केले. मात्र त्याचा कोणताही मोबदला दिला नाही. त्यांनतर त्याने अंगाला तेल लावून मालीश करायला सांगितली व कपडे काढण्यासाठी सांगितले. त्यास विरोध केला असता आरोपी राजाराम काथोड पाटील याने माझे कपडे काढत असताना त्याची पत्नी तेथे आली, त्यावेळी त्याने त्याच्या पत्नीला देखील मारहाण करत शिवीगाळ केली. सावकार राजाराम पाटील कामाला गेलो नाही तर मारहाण करत असे, त्याचबरोबर दुसरीकडे मजुरीला पाठवत नसे. दुसरीकडे मजुरीला गेलो तर मारहाण होत असे. पोलिसांकडे गेलो तर पोलीस देखील कारवाई करत नाहीत, अशी आपबिती पीडित मुलीने सांगितली.
सावकार राजाराम व चंद्रकांत हे दोघे सख्खे भाऊ आहेत. राजाराम पाटील हा तर खूप वाईट माणूस आहे. पाड्यात एखादी महिला विवाह करून आली तर तो मजुरीसाठी घरी बोलवायचा, सुंदर माहिलांकडे अतिशय वाईट नजरेने बघायचा. अनेक महिलांवर त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्याची लवकर सुटका झाली तर तो आम्हाला आणखी जास्त त्रास देईल. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महिलांनी केली आहे.