भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांग्लादेशचा नाही, पण, तुमच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या? : आशिष शेलार
भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक कक्षाचे अध्यक्ष रुबेल शेख हे बांग्लादेशी असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.दरम्यान, यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : भाजपचे काही लोक गोमातेची तस्करी करत असल्याचे समोल आलंय तर काही आयएसआय एजंटही सिद्ध झाले आहेत. पण, आता भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक कक्षाचे अध्यक्ष रुबेल शेख हे बांग्लादेशी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. दरम्यान, यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पलटवार करत उत्तर दिले आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. भाजपचा संघजिहाद, भाजप काही लोक गोमातेची तस्करी करत असल्याचं सिद्ध झालंय तर काही आयएसआय एजंट असल्याचेही समोर आलं आहे. पण, आता भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक कक्षाचे अध्यक्ष रुबेल शेख हे बांग्लादेशी निघाले आहेत. हा भाजपचा संघजिहाद आहे का? सीएए कायद्यात भाजपसाठी नवीन तरतूद केली गेली आहे का? असे प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केलेत. सोबतच मालाड पश्चिमेत मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मालवणी पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने बांग्लादेशी नागरिकावर कारवाई केल्याचे कागदपत्र जोडले आहे.भाजपा का संघजिहाद! भाजपा के कुछ लोग गौमाता की तस्करी करते हुए और कुछ ISI agent भी साबित हुएं हैं। पर अब तो @bjp4mumbai के अल्पसंख्यक सेल का अध्यक्ष रुबेल शेख तो बांग्लादेशी निकला। क्या यह भाजपा का संघजिहाद है? क्या CAA कानून में भाजपा के लिए नया प्रावधान किया गया है? pic.twitter.com/cZq0yqycKf
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 19, 2021
आमदार आशिष शेलार यांचा पलटवार भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांग्लादेशचा नाही. मला सचिन सावंत यांना विचारायचं नाही की त्यांच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या आहेत. मी ते विचारणार नाही. पोलिसांकडे कागदपत्र असतील तर त्यांनी कारवाई करावी. पण भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांगलादेशी नाही. प्रसिद्धीसाठी सचिन सावंत वायफळ आरोप करत आहेत, असा पलटवार आशिष शेलार यांनी केलाय.
काय आहे प्रकरण? काही दिवसांपूर्वी मालाड पश्चिमेतील मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केली. यात एक धक्कादायक बाब समोर आल्यामुळं आता भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रुबेल शेख हा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहे, इथं तो बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्यक युवकपदी काम करत होता असंही समजलंय. मुख्य म्हणजे तो बांग्लादेशी नागरिक आहे, याच माहितीच्या आधारे मालवणी पोलिसांनी मालवणी परिसरात आठ नंबर गेटसमोर छापा कारवाई करून रुबेल शेख याला अटक केली आहे. त्याच्या घरात झडती घेतली असता भारतीय बनावट कागदपत्रे सापडली आहेत.