(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'MCA निवडणुकीवेळी पडद्यामागे काही घडलंच नाही असं नाही, नवीन वर्षात फटाके फोडूयात', आशिष शेलारांचं सूचक वक्तव्य
पडद्यामागे काही घडलंच नसेल असं मी म्हणणार नाही. आताच दिवाळी संपली आहे, नवीन वर्षात फटाके फोडूयात, असा सूचक इशारा आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी दिला आहे.
Ashish Shelar On MCA Election: भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्याच्या राजकारणात आगामी काळात राजकीय 'फटाके' फुटतील अशा आशयाचं वक्तव्य केलं आहे. पडद्यामागे काही घडलंच नसेल असं मी म्हणणार नाही. आताच दिवाळी संपली आहे, नवीन वर्षात फटाके फोडूयात, असा सूचक इशारा आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी दिला आहे. सगळे पक्ष राज्याच्या भल्यासाठी एकत्र येऊन विचार करतील तर त्याचं कौतुक व्हायला हवं. हे जर खेळाच्या मैदानापासून सुरु होणार असेल तर ते स्वागतार्ह आहे. बऱ्याच गोष्टी पडद्याआड घडत असतात, असं देखील ते म्हणाले. राजकारणाच्या चर्चा आमच्या झाल्या आहेतच. पण यातून काही कटकारस्थान वगेरे आहे असं नाही. दोन राजकारणी भेटले की, एकमेकांबद्दल आकर्षण वाढतं, असं देखील ते म्हणाले.
शेलार म्हणाले की, क्रिकेटपटूंना संधी मिळायला हवी, असं मलाही वाटतं. पण मतदार मतदान करतात. ते ठरवतात की कुणाला जिंकून द्यायचं. संदीप पाटलांबाबत सांगायचं झालं तर त्यांनी एकदा साद घातली असती, एक पाऊल पुढे आले असते तर तेच अध्यक्ष झाले असते, असं ते म्हणाले.
आशिष शेलार म्हणाले की, दोन वेळेस संदीप पाटलांना संधी होती. त्यांनी संधी घेतली नाही. आम्ही लढलो त्यांच्याविरोधात. त्यांच्याबाबत खेळाडूपणा आणि आमचा अखेळाडूपणा असं होत नाही. त्यांना पवार गटाने उमेदवारी दिली होती, हा भ्रम पवारांनीच दूर केला. पवार साहेबांचे मला त्या काळात तीनदा फोन आले. मी त्यांना म्हटलं याचं स्पष्टीकरण तुम्हीच द्यायचं आहे. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी आमच्यासोबत पॅनल करुन दिलं, असं शेलारांनी सांगितलं.
आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंची मध्यावधीची भाषा
शेलार यांनी एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना म्हटलं आहे की, आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंची मध्यावधीची भाषा बोलत आहेत. स्वत:च्या गेलेल्या लोकांचा आरोप काय आहे, त्यावर उद्धव ठाकरे काय बोलले का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
शेलार यांनी म्हटलं की, स्वत:चे मंत्री, आमदार, सदस्य त्यांची सत्ता असताना गेले. सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे होत्या, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तरी ते गेले. मतदानही त्यांनी विरोधात केलं, तुमच्याशी ते बोलले सुद्धा. त्यांच्या आरोप आहे की, शिवसेना दुबळी केली जातेय, बाळासाहेबांच्या विचारांपासून भरकटतेय, राष्ट्रवादी आमच्याशी राजकारण करतेय. या सर्व प्रश्नांना बगल द्यायची आणि भावनात्मक मुद्द्यांवर उरलेल्या शिवसैनिकांना टिकवण्यासाठी गद्दारीचं गाजर द्यायचं, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेलांरांनी म्हटलं की, ठाकरेंकडून आज राहिलेले जे काही आहेत त्यांना हे सांगितलं जातंय की, आपण एकनाथजींबरोबर येऊ. मुंबईतील खासदारांच्या सुपुत्रांना असं सांगितलं, असा दावाही त्यांनी केला. जाणारे व्यक्ती सांगून जात आहेत की उद्धवजी हे चुकतंय. अखिल भारतात एकमेव पक्ष आणि नेते आहेत उद्धवजी, त्यांचे निर्णय योग्य असतात, इतक्या अहंकारात ते आहेत, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला आहे. पुढील अडीच वर्ष आणि त्यापुढेही हे सरकार राहील, असंही शेलार म्हणाले.