Asha Sevika in BMC : मुंबई महापालिकेच्या आशा सेविका भरतीमध्ये विवाहित महिलांना प्राधान्य : सूत्र
Asha Sevika in BMC : मुंबई महापालिकेच्या आशा सेविका भरतीमध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
Asha Sevika in BMC : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आशा सेविका (Asha Sevika) भरतीमध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत वस्ती पातळीवर गृहभेटीद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधाकरिता आशा सेविका या कामावर आधारित मोबदला तत्त्वावर नेमणूक करायची आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या संदर्भात जाहिरात काढली असून यामध्ये विवाहित (Married) आशा सेविकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे
आशा सेविकांसाठी वयाची अट
मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 1000 ते 1200 लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका आणि अशा 250 घरांकरता नेमणूक करण्यात येईल. निवडीच्या निकषांमध्ये जरी ही अट दिली नसली तरी यामध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. शिवाय आशा सेविकांची वयोमर्यादा सुद्धा 25 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.
'या' कारणासाठी विवाहित आशा सेविकांना प्राधान्य
या आशा सेविकांवर विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी यामध्ये असणार आहे. विवाहित महिला असली तर कुटुंब नियोजन, गरोदर माता यासंबंधीच्या विषयांवर संवाद साधणे सोपे जाते त्यासाठी ही अलिखित अट असल्याचं सांगितलं गेलं आहे.
आशा सेविका कोण असतात, त्या नेमकं काय काम करतात?
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते. आशा सेविका ही गावातील स्थानिक असते. आशा सेविकेकडून गावातील आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेतृत्व करणे हे योगदान अपेक्षित असतं. साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्या आशा सेविकांवर असते. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने 'आशा सेविका' सामाजिक दुवा म्हणून काम करतात. राज्यभरात साधारण 70 हजार आशा सेविका कार्यरत आहेत. आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1 हजार लोकसंख्येमागे 1 आशा सेविका नियुक्त आहे तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 1500 लोकसंख्येमागे 1 आशा सेविका नियुक्त आहे.