Aryan Khan case : 'गोसावीने आर्यनसोबत काढलेल्या सेल्फीमुळे 18 कोटी गेले'
Aryan Khan case : आर्यन खान प्रकरण घडवून आणलं गेलं असल्याचा धक्कादायक दावा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे
Aryan Khan case : आर्यन खान प्रकरणात नवीन खुलासे, दावे करण्यात येत आहेत. आर्यन खान प्रकरणात आणखी एक साक्षीदार विजय पगारे यांनी मोठा दावा केला आहे. किरण गोसावी याने आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीमुळे 18 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सुनील पाटील यांनी म्हटले होते, असे पगारे यांनी सांगितले.
कथित क्रूझ ड्रग्ज पार्टीवर झालेल्या कारवाईबाबत याआधीच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रकरणी मागील काही दिवसांपासून नवीन खुलासे होत आहेत. विजय पगारे यांनी एबीपी माझासोबत बोलताना आणखी काही खुलासे करताना क्रूझ पार्टीवरील छापामारीच्या दिवसापर्यंतचा घटनाक्रम सांगितला.
विजय पगारे यांनी म्हटले की, त्यादिवशी दिवसभर किरण गोसावी आणि मनीष भानुशाली सतत टीव्हीवर दिसत होते. 4 तारखेला माझं बोलणं सुनील पाटील सोबत झालं. त्यावेळी त्याने किरण गोसावीच्या मस्तीमुळे एक सेल्फी आपल्याला 18 कोटी रुपयांना पडला असल्याचे सांगितलं. किरण गोसावीच्या मस्तीमुळं हातात आलेला सर्व पैसा परत गेला. त्यानंतर मला लक्षात आलं आर्यन खानला फसवलं जात आहे. त्यामुळे मी लगेचच माझ्या एका मित्राला घेऊन किल्ला कोर्टात आलो. तिथं आर्यन खानला आणण्यात आलं होतं. मी सतीश माने शिंदे यांना भेटून आर्यन खानला फसवलं आहे असं सांगितलं परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही असेही पगारे यांनी म्हटले.
मोठी गेम लागली असल्याचा दावा!
विजय पगारे यांनी म्हटले की, मला हे 3 तारखेला लक्षात आलं की यांनी आर्यन खानला फसवलं आहे. हा सगळा प्रकार 27 सप्टेंबर पासून सुरू होता. मी, सुनील पाटील आणि किरण गोसावी वाशीच्या फॉर्च्युन हॉटेलला होतो त्यावेळी मनीष भानुशाली आणि त्याची एक मैत्रीण प्रचंड दारू पिऊन हॉटेलवर आले होते. यावेळी सुनील पाटीलला मनीष भानुशालीने आपल्या हाताला एक मोठी गेम लागल्याचं सांगितलं. त्यातून खूप पैसे मिळणार असल्याचं सांगितलं. शिवाय आत्ताच अहमदाबादला जायचं आहे असं सांगितलं. त्यानुसार गाडीने सुनील पाटील आणि किरण गोसावी अहमदाबादला गेले आणि मनीष विमानाने दुसऱ्या दिवशी अहमदाबादला गेले. त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो परंतु होऊ शकला नाही. 2 ऑक्टोबर रोजी माझं आणि सुनील पाटील याचं बोलणं झालं. त्यादिवशी मी आज किंवा उद्या तुमचे घेतलेले 35 लाख रुपये देतो असं सुनील पाटील म्हणाला. आपल्या हाताला मोठं काम मिळालं आहे त्यामुळे निश्चितपणे राहा असं म्हणाला.
3 ऑक्टोबर रोजी पहाटे हॉटेलला मनीष भानुशाली आला आणि त्याने आपलं मोठं काम झाल्याचं सांगितलं. तो मला एनसीबी ऑफिसला घेऊन आला. त्यावेळी प्रवासात तो मराठी, गुजराती आणि हिंदी भाषेत सतत बोलत होता आपले पैसे अधिकारी तर खाणार नाहीत ना किरण गोसावी पैसे घेऊन गायब तर होणार नाही ना अशा चर्चा तो फोनवर करत होता. यामध्ये सुनील पाटील याच्याशी देखील त्याचं बोलणं होत होतं. मी एनसीबी ऑफिसला गेल्यावर प्रचंड कॅमेरे त्याठिकाणी मला दिसले. मी घाबरलो मला लक्षात आलं यांनी काहितरी घोळ केला आहे त्यामुळे मी लगेचच हॉटेलला आलो असल्याचे पगारे यांनी सांगितलं.
संबंधित वृत्त:
Aryan Khan case : आर्यन खान प्रकरण घडवून आणलं; साक्षीदार विजय पगारेंचा दावा