Antilia Explosives Scare | 'ती' इनोव्हा मुंबईतच : देवेंद्र फडणवीस
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आली होती. सध्या एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशातच आरोपींनी ज्या गाडीतून पळ काढला ती इनोव्हा गाडी मुंबईतच असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. अशातच अँटिलियाबाहेर स्फोटकं स्कॉर्पिओ गाडीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या एका इनोव्हा गाडीतून आरोपींनी पळ काढला होता. स्कॉर्पिओ गाडी पोलिसांच्या ताब्यात असून या गाडीचा तपासही एटीएस करत आहे. परंतु, अद्याप इनोव्हा गाडी सापडलेली नाही. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुसाला केला आहे. ती इनोव्हा गाडी मुंबईतच असून लवकरच त्यासंदर्भात माहिती जाहीर करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
अँटिलियाबाहेर स्फोटकं आढळलेली स्कॉर्पिओ गाडी मुंबईतील व्यापारी मनसुख यांची होती. काही दिवसांपूर्वी ती गाडी चोरीला गेली होती. अशातच मनसुख हिरेन यांचाही काही दिवसांपूर्वी संशयितरित्या मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळून आला होता. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. विधानसभेत बोलताना फडणवीसांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा उल्लेख करत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली आणि मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे असतानाही त्यांना अटक का होत नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांच्या तक्रारीचा अर्ज वाचून दाखवला. मनसुख हिरेन यांची गाडीतच हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत फेकून देण्यात आला होता. खाडीत भरतीची वेळ असल्याने मनसुख हिरेन यांचा मृतदेह किनाऱ्यावर येणारच नाही, असा हत्यारांचा समज होता. मात्र खाडीत भरती न आल्याने मृतदेह किनाऱ्यावर आला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली पाहिजे अशी मागणी हिरेन यांच्या पत्नीने केली आहे.
अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्हीत कैद
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. एटीएसच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या परिसरात दिसलेल्या इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पुन्हा अँटिलिया परिसरात आला होता. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने पीपीई किट घातलं होतं. या भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संशयित आरोपी कैद झाला आहे. परंतु पीपीई किट घातलं असल्याने त्याची ओळख पटलेली नाही.
संशयिताने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानापासून 500 मीटर अंतरावर स्कॉर्पिओमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या होत्या. त्यानंतर स्कॉर्पिओचा चालक इनोव्हा गाडीतून पळून गेला होता. स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाला मुलुंड टोल नाका पार केल्यावर पुन्हा एकदा अँटिलिया येथे पाहण्यात आलं. रात्री 3 वाजून 05 मिनिटांना इनोव्हा गाडी मुंलुड टोल नाका पार करताना दिसली होती. त्यानंतर पुन्हा अँटिलिया येथे दिसून आली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडीच्या चालकाने गाडीचा नंबर पुन्हा बदलला होता. पहाटे साडेचारच्या सुमारास मुलुंड टोल ओलांडून इनोव्हा पुन्हा मुंबईत आली. त्यानंतर इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी स्कॉर्पिओ गाडी पार्क केलेल्या ठिकाणी पोहोचला. संशयिताने स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली आणि मग निघून गेला आणि त्यानंतर पहाटे 5 वाजून 18 मिनिटांनी त्याने पुन्हा मुलुंड टोल नाका ओलांडला. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातला होता आणि पीपीई किट घालून तो इनोव्हा गाडी चालवत होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Antilia Explosives Scare | अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्हीत कैद
- Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा तपास एटीएसकडे
- Antilia Explosives Scare | अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू; मुंब्रा खाडीत सापडला मृतदेह
- Antilia Bomb Scare | गाडी दिसल्यावर पहिल्यांदा सचिन वाझे पोहोचले, घटनाक्रम शंका निर्माण करणारा, तपास एनआयएने करावा : देवेंद्र फडणवीस