एक्स्प्लोर
चांदिवली विधानसभेवर 20 वर्षांनी भगवा फडकवण्यासाठी अनिल परब सज्ज
अंधेरीतील चांदिवली विधानसभा जिंकण्याची जबाबदारी शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार अनिल परब यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा पुढील महिन्यात कधीही जाहीर होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मुंबईतील चांदिवली विधानसभेवर वीस वर्षांनंतर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना आमदार अनिल परब यांनी चंग बांधला आहे. पुढचा मुख्यमंत्री भाजप आणि शिवसेना युतीचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 'आमचं ठरलंय' असं सेना-भाजपकडून सांगण्यात येत असलं, तरी युतीचा फायनल फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात आहे. अर्थात महाराष्ट्रात भगवा फडकवत ठेवायचा असेल, तर मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आणणं महत्त्वाचं आहे. विधानसभेच्या वेगवेगळ्या मतदारसंघांची जबाबदारी विविध नेत्यांवर देण्यात आली आहे. अंधेरीतील चांदिवली विधानसभा जिंकण्यासाठी अनिल परब यांच्याकडे धुरा देण्यात आली आहे. अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत. विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांची नियुक्ती झाली आहे. अनिल परब यांनी तात्काळ कामाला सुरुवात केली असून चांदिवलीत शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. 'वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा चांदिवली विधानसभेवर भगवा फडकणार. शिवसैनिकांनी कामाला लागलं पाहिजे. मात्र प्रतिस्पर्ध्याला कमी समजू नये.' असं सांगताना अनिल परब यांनी उपस्थितांना लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दाखला दिला. मुख्यमंत्री कोणाचा असेल, हेही अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ठरवतील. ते घेतील तो निर्णय योग्य वेळी कळवू असंही परब यांनी शिवसैनिकांना सांगितलं. चांदिवली विधानसभेवर काँग्रेसचं वर्चस्व गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये चांदिवलीवर काँग्रेसचं वर्चस्व आहे. 2009 आणि 2014 मध्ये काँग्रेस आमदार मोहम्मद अरीफ (नसीम) खान यांनी ही जागा जिंकली आहे. 2009 मध्ये शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या, तर 2014 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. अनिल परब विजयाचे शिल्पकार वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत चुरशीच्या लढतीत शिवसेनेने भगवा डौलाने फडकवला होता. तृप्ती सावंत यांनी तब्बल 19 हजार मतांनी विजय मिळवला. मात्र या विजयाचे शिल्पकार अनिल परब ठरले. मतदारसंघातील प्रत्येक विभाग, प्रत्येक कॉलनी आणि प्रत्येक बूथचं योग्य नियोजन आणि समन्वय करुन अनिल परब यांनी मोठा विजय मिळवून दिला होता.
आणखी वाचा























