Anil Deshmukh Resign LIVE: गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या घरी खलबत
Maharashtra Home Minister, Anil Deshmukh Resign LIVE Updates: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
LIVE

Background
गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला, ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या घरी खलबत
गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा अशी जवळपास तासभर खलबतं केली. यावेळी राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टातले वकील राहुल चिटणीस आणि इतर जवळपास 5-6 वकिलांची फौजही या निवासस्थानी हजर होती. हायकोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टात याबाबत काय पाऊल उचलता येईल यावर या बैठकीत मंथन झालं आहे. बैठकीनंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता अनिल देशमुख हे तिथून निघाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांचं पुढचं पाऊल आता काय असणार याची उत्सुकता आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला असून गृह विभागाचा कार्यभार मंत्री, कामगार व राज्य उत्पादन शुल्क दिलीप वळसे पाटील यांचेकडे देण्यास मंजुरी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ, मंत्री, ग्राम विकास यांचेकडे देण्यास तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.
अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं यासाठीच राजीनामा दिला - छगन भुजबळ
अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं यासाठीच राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टात दाद मागणार की नाही याबाबत मला कल्पना नाही, परंतु ज्येष्ठ वकीलाशी चर्चा करतील, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र
अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे
अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकार पारदर्शक असल्याचा पुरावा : बच्चू कडू
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकार पारदर्शक असल्याचा पुरावा असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटल. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा त्यांच्यावरील लावलेल्या आरोपांची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शी व्हावी यासाठी दिला. तर विदर्भातील मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे का?, या प्रश्नाचं उत्तर देतांना त्यांनी यात कोणताही प्रांतवाद दिसत नसल्याचं म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
