Andheri By Poll Election: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 31.74 टक्के मतदान, निकाल 6 नोव्हेंबरला
Andheri East by Poll : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 31.74 टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. मतमोजणी रविवारी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे
Andheri East by Poll : महाराष्ट्र विधानसभेच्या '166 - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत 31.74 टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज दिली. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली होती. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्यासमोर सहा अन्य उमेदवारांचं आव्हान आहे.
अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी 1 वाजेपर्यंत 16.89 टक्के मतदान झाले. तर दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के; सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.77 टक्के मतदान झाले. तर मतदान प्रक्रियेच्या अखेरीस अर्थात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघात सुमारे 31.74 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी दिली.
पोटनिवडणुकीसाठी हे 7 उमेदवार रिंगणात
१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. नीना खेडेकर (अपक्ष)
५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
या 256 मतदान केंद्रांपैकी मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे मतदान केंद्र क्रमांक 53 मध्ये सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्रांमध्ये एकूण 1418 मतदारांमध्ये 726 महिला मतदार असल्याने आणि महिला मतदारांची ही संख्या अंधेरी पूर्व मतदारसंघात सर्वाधिक असल्याने या ठिकाणीच सखी मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले.
मतदानादरम्यान आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअर, वैद्यकीय किट, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी सोयी सुविधांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडल्याबद्दल निवडणूक कार्यासाठी काम केलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
ही मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेंद्र नानोसकर, अजय घोळवे, अरुण कटाले आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून, दत्तात्रय सातपुते यांनी विशेष मेहनत घेतली. तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी साधारणपणे 1 हजार 600 अधिकारी / कर्मचारी, 1 हजार 100 एवढ्या संख्येतील मुंबई पोलीस दल व इतर सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित होते. या व्यतिरिक्त 70 सूक्ष्म निरीक्षक देखील कर्तव्यावर होते.
आजच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने मतमोजणी रविवारी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू होणार आहे, अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.