Mumbai News : जामीन मिळूनही आरोपी 3 वर्षे तुरुंगात, जामिनाची रक्कम 5 लाखांवरुन एक लाख करत कोर्टाचा दिलासा
Mumbai News : एनएसईएल घोटाळ्यातील आरोपी जामीन मिळूनही गेली तीन वर्षे तुरुंगात आहे. PMLA न्यायालयाने आरोपीला दिलासा देताना जामिनाची रक्कम कमी केली आहे. आता या आरोपीला 1 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत.
Mumbai News : मुंबईतील एनएसईएल घोटाळ्यातील (NSEL Scam) 53 वर्षीय आरोपी जामीन मिळूनही गेली तीन वर्षे तुरुंगात आहे. खरंतर आरोपीला जामीन म्हणून पाच लाख रुपये जमा करायचे होते, मात्र ही रक्कम तो जमा करु शकला नाही. त्यामुळे विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (PMLA) न्यायालयाने आरोपीला दिलासा देताना जामिनाची रक्कम कमी केली आहे. आता या आरोपीला 1 लाख रुपये जमा करावे लागणार आहेत.
NSEL घोटाळ्याच्या आरोपाखाली 53 वर्षीय आरोपी रंजीव अग्रवालची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. आरोपी रंजीव अग्रवालला तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्याने दाखल केलेल्या याचिकेत 5 लाख रुपयांची जातमुचलक्याची रक्कम कमी करुन 50 हजार रुपये करण्याची विनंती केली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये आपल्याला जामीन मिळाला होता. त्याच्यासह 66 आरोपींनाही जामीन मिळाला आहे. मात्र मीच तुरुंगात आहे, असं त्याने याचिकेत म्हटलं होतं.
यावर आरोपी रंजीव वगळता उर्वरित आरोपींची जमिनावर सुटका करण्यात आली आहे. आरोपी रंजीवलाही जामीन मंजूर झाला होता, मात्र जामीनाची रक्कम जास्त असल्याने तो अजूनही तुरुंगात आहे. त्यामुळे जामिनाची रक्कम कमी करण्यात येत आहे, असं विशेष न्यायाधीश ए एस सय्यद यांनी नमूद केलं. तसंच जामिनाची रक्कम कमी करण्याची परवानगी दिल्यास फिर्यादी पक्षाने कोणताही पूर्वग्रह ठेवू नये, असंही न्यायाधीशांनी म्हटलं.
तर हा गुन्हा गंभीर असल्याचं सांगत फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी याला विरोध केला होता. आरोपी रंजीव अग्रवाल हा अनेक अजामीनपात्र वॉरंट बजावूनही न्यायालयात हजर झाला नाही. आरोपीचं कृत्य आणि वर्तनावरुन त्याने कायद्याचं उल्लंघन केल्याचं दिसत आहे. जामिनाच्या अटींची पूर्तता न केल्यामुळे आरोपी तुरुंगात आहे. त्यामुळे आरोपी स्वत:च्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही, असं वकिलांनी म्हटलं आहे
15 हजार रुपयांपेक्षाच्या जास्त जामिनासाठी, संबंधित व्यक्तीला त्यापेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेचे करपात्रता प्रमाणपत्र सादर करावं लागतं. तर 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या जामिनासाठी उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड आणि वास्तव्याचा पुरावा पुरेसा असतो.