Devendra Fadnavis office attack: मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच मोडतोड करण्याचा प्रयत्न

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात (Mantralaya) शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. या महिलेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Office) यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ही महिला इथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.
मात्र, या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर केली आणि त्याठिकाणी तोडफोड केली. या महिलेने कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली आणि यानंतर घोषणाबाजी केली. ही महिला नक्की काय म्हणत होती, हे अद्याप समजू शकलेले नाही. ही महिला कोण होती, ती विनापास आतमध्ये कशी शिरली, या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. मरिनड्राईव्ह पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरु केला आहे. त्यामुळे आता तपासातून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.
मात्र, या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयातील गृहमंत्र्याचेच कार्यालय सुरक्षित नाही, याबाबत टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला आधुनिक काळातील अभिमन्यू म्हणवून घेतात. पण त्यांना जवळच्याच लोकांपासून धोका आहे का, हे त्यांनी तपासून पाहावे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. तर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत पोलीस तपासात सगळ्या गोष्टी समोर येतील, असे सांगितले आहे. या सगळ्यामध्ये विधायक मार्गांनी आपण गोष्टी केल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीस लोकाभिमुख नेता आहे, त्यांच्याकडे लोकशाही पद्धतीने मागण्या मांडल्या पाहिजेत, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले.
VIDEO: देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
