Mumbai Local Train Accident: मित्र ट्रेनमधून पडला, एक प्रवासी उडत आला अन् तीन जणांना घेऊन गेला; लोकलमधील प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा भयावह घटनाक्रम
Mumbai Local Train Accident: दोन लोकल गाड्या एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना दरवाजांजवळ लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. यामुळे 8 प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळले.

Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा स्थानकाजवळ आज (दि. 9 जून) सकाळी सुमारे 9.30 वाजता भीषण रेल्वे अपघात (Mumbai Local Train Accident) घडला. दोन लोकल गाड्या एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना, दरवाजांजवळ लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले. यामुळे 8 प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळले. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यात अपघातावेळी लोकलमध्ये असलेल्या एका प्रवाशाने अपघाताचा भयावह घटनाक्रम सांगितला आहे.
प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे की, आम्ही भिवंडीत वास्तव्यास आहोत. आम्ही चार लोक लोकलमधून प्रवास करत कामावर जात होतो. आमचा एक मित्र अपघातात ट्रॅकवर पडला. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आमच्या आधीच्या डब्यातून एक प्रवासी उडत आला आणि आमच्या डब्यातून तीन लोकांना घेऊन गेला. त्यानंतर मागील डब्यातून देखील खाली लोक रेल्वे ट्रॅकवर पडले. डब्यातील काही लोक देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर आमची ठाणे स्टेशनवर उतरलो आणि दुसरी लोक पकडून इकडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहोत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.
नेमका कसा झाला अपघात?
मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. लोकलमधील काही प्रवासी अप आणि डाऊन ट्रॅकवरील गाड्यांदरम्यान असलेल्या फूटओव्हरवरून प्रवास करत होते. एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने तर दुसरी कसाराच्या दिशेने जात होती. दोन्ही लोकल अगदी जवळून जात असताना, दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या पाठीवरील बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या. यामुळे धक्का लागून 8 प्रवासी थेट ट्रॅकवर पडले. ही दुर्घटना सकाळी 9.30 वाजता घडली. घटनेनंतर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना अतिशय दुर्दैवी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.
आणखी वाचा























