Diwali Bonus : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 42 हजार रुपयांचा बोनस जाहीर
MMRDA Bonus to Employee : एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के अधिकचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार असून दिवाळीनिमित्त 42,350 हजार रूपये बोनस (Diwali Bonus) जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली असून हा बोनस सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहे. सदरचा बोनस अदा करण्यास मंजुरी देत असल्याचे परिपत्रक एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (IAS) यांनी जारी केले आहे.
गेल्या वर्षी एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून 38,550 रुपये अदा करण्यात आले होते. यावर्षी त्यात 10 टक्क्यांनी वाढ करून बोनसची रक्कम 42,350 रुपये इतकी करण्यात आली आहे. बोनसची घोषणा केल्यानंतर एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या कर्मचाऱ्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.
एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर घोषणा करतेवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, "दिवाळी हा आनंदाचा सण असून यावर्षी दिवाळीचा गोडवा द्विगुणित व्हावा यासाठी आम्ही एमएमआरडीएच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 42,350 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. समस्त सरकारी कर्मचारी हे राज्य सरकारच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सानुग्रह अनुदानात 10 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या सरकारी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा आनंद बहुमोल आहे."
एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यावेळी बोलताना म्हटले की, "हे सानुग्रह अनुदान म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच म्हणावी लागेल. एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी या गोड बातमीनंतर अधिक आनंदात जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा".
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
