Sindoor Flyover : ब्रिटिश वारशाचा अंत, 'सिंदूर' उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
Mumbai Sindoor Flyover : भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीनंतर मनपाने कर्नाक पुलाला सिंदूर असं नाव दिले ही आनंदाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मशीद बंदर, मुंबई येथे 'सिंदूर' उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. दीडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख होती. कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे 'सिंदूर' नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळे अध्याय संपायला हवेत, त्याच्या खुणा मिटायला हव्यात' असे आवाहन केले होते. यालाच अनुसरून कर्नाक पुलाचे नाव बदलण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी अड्डे नष्ट केले. सेनेच्या या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वानुमते 'मनपा'ने या पुलाला 'सिंदूर' हे नाव दिले, ही आनंदाची गोष्ट आहे. या पुलाची एकूण लांबी 328 मीटर असून रेल्वेच्या हद्दीत 70 मीटर आहे. यासोबतच मुंबईतील वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
रेल्वेमार्गावरील पूल असल्याने अनेक अडचणी येत होत्या, या अडचणींवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे
- मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी डी' मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.
- पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे 10 वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतूक व्यवस्था सुलभ होणार.
- पूल कार्यान्वित झाल्यावर पी डी' मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
- पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक होणार सुलभ.
ही बातमी वाचा:























