(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, 20 कोटींची मागणी
Death Threat to Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकीधमकी देणाऱ्याकडून 20 कोटी रुपयांची मागणी, मुकेश अंबानींना धमकीचा ईमेल पाठवल्याची माहिती
Mukesh Ambani: मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर जीवे मारू असं धमकी देणाऱ्यानं म्हटलं आहे. मुकेश अंबानींना ईमेलमार्फत धमकी आल्याची माहिती मिळत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीनं मुकेश अंबानींच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता. धमकीच्या ई-मेलमध्ये मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत." मुकेश अंबानींच्या ईमेलवर आलेला मेल पूर्णपणे इंग्रजीत होता.
धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
या आधीही आली होती मुकेश अंबानी यांना धमकी
यापूर्वी सुद्धा अनेकदा अंबानी कुटुंबांना असे धमकी कॉल्स आणि ईमेल आलेत. एक वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल आला होता. सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर डॉ डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
त्यानंतर ऑगस्ट 2022 ला देखील मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आतंकवादी अफजल गुरु आहे असे सांगून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी आणि त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. या आरोपीने रिलायन्स रुग्णालयात नऊ वेळा कॉल करुन धमकी दिली. त्यानंतर विष्णू बिंदू भूमिक या 56 वर्षीय आरोपीला बोरीवलीमधून ताब्यात घेण्यात आलं.
या सर्व प्रकरणात मुंबई पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखा यांनी तपास केल्यानंतर हे समजलं की हे कॉल नशेत करण्यात आले होते. मात्र या ई-मेलची गंभीरता पाहता मुंबई पोलीस मुंबई गुन्हे शाखा यांनी तपास सुरू करण्यात आलाय. तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीचा शोध देखील घेण्यात येत आहे.