Devendra Fadnavis vs Amit Shah : मुंबई कार्यालय ते नागपूरपर्यंत भाजपच्या पोस्टर्सवरून थेट अमित शाहच गायब!
Amit Shah : भाजपकडून मुंबई कार्यालयात जल्लोष करण्यात आला, पण या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शाह गायब होते. नागपूरमध्येही माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेल्या फलकावरून अमित शहा गायब होते.
Devendra Fadnavis vs Amit Shah : काल राज्यामध्ये अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती पाहायला मिळाली. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिंदे गट त्यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरू असतानाच एकदम आश्चर्यचकित करणारी घटना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घडली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केल्यानंतर तसेच मंत्रिमंडळातही सहभागी होणार नसल्याचे सांगितल्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली. यामुळे या निर्णयामागे मग कोणाचा हात? देवेंद्र फडणवीस यांचे कोणी पंख कापले? अशी एकच चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु झाली. सोशल मीडियातही अजून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीतून फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. मोदी यांनी दोनवेळा फोन केल्याचेही वृत्त झळकले. यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे असे ट्विट करत मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी पार पाडला.
या सगळ्या प्रकारात अमित शाहांचाच हात आहे आणि त्यांच्यामुळेच फडणवीस यांनी ठाकरे सरकार घालवण्यासाठी अविरत प्रयत्न करूनही त्यांची उपमुख्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली, अशी प्रतिक्रिया फडणवीस समर्थकांमध्ये उमटत आहे. आज भाजपकडून मुंबई कार्यालयात जल्लोष करण्यात आला, पण या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरून अमित शहा गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागपूरमध्येही माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेल्या फलकावरून अमित शाह गायब होते. कधी नव्हे ते अमित शाहांचा फोटो बॅनर करून गायब झाल्याने भाजपमधील नाराजी समोर आली आहे.
फडणावीसांचे नागपुरात जोरदार स्वागत करणार
दरम्यान, नागपूरचे भाजपचे माजी महापौर संदीप जोशी यांनी फडणवीसांचे नागपुरात जोरदार स्वागत करणार असल्याचे सांगितले आहे. फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची संधी न मिळाल्याने होर्डिंग लावून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मागील अडीच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्र्यांपेक्षा पायाला भिंगरी लावून प्रवास केला, 5 वर्ष चांगलं काम करूनही घात झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मित्र म्हणून हे निश्चित खूप दुःख असल्याचेही शिंदे म्हणाले.