Mumbai Local Megablock : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेवर 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान ब्लॉक, 250 लोकलही रद्द
तब्बल 15 वर्षे रखडलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचं काम पश्चिम रेल्वेने सुरू केलं आहे. त्यासाठी तब्बल 10 दिवस 250 लोकल रद्द करण्यात येणार आहे.
Mumbai Local Megablock : मुंबईकरांसाठी (Mumbai News) अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते बोरिवली (Borivali) ही सहावी मार्गिका जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेवर (Western Railway) ब्लॉक घेण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत 250 लोकल आणि 61 मेल, एक्सप्रेसही रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे तब्बल 10 दिवस पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे.
तब्बल 15 वर्षे रखडलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचं काम पश्चिम रेल्वेने सुरू केलं आहे. सध्या प्राथमिक काम सुरू असून मुख्य काम दसऱ्यानंतर म्हणजेच, 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून यामध्ये रोज सरासरी 250 लोकल आणि 61 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.
ब्लॉक काळात लोकल फेऱ्याही उशीरानं : रेल्वे प्रशासन
रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचं काम 7 ऑक्टोबरपासून सुरू झालं असून 26 दिवस रूळजोडणीचं काम सुरू राहणार आहे. 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत रूळजोडणीचं मुख्य काम करण्यात येणार आहे. या शेवटच्या दहा दिवसांत रोज सरासरी सुमारे 250 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तसेच, लोकल फेऱ्याही उशीरानं धावणार आहेत. मुंबई लोकलवर कमीत कमी परिणाम होईल, तसं नियोजन रेल्वे अधिकाऱ्यांनी केलं आहे. रूळजोडणीच्या कामासाठी रुळांवरील वाहतूक थांबवणं गरजेचं आहे. मुंबई लोकल सलग काही दिवस बंद ठेवणं शक्य नसल्यानं ब्लॉककाळात काही लोकल आणि मेल-एक्स्प्रेस फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान सहाव्या मार्गिकेची जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे मेल-एक्स्प्रेस वाहतूक विनाअडथळा सुरू राहणार आहे. तसेच, नव्या मार्गिकेची सध्याच्या रुळांवर जोडणी देण्याचं काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी केली. तपासणीनंतर लोकल चालवण्यात येणार आहेत. सहाव्या मार्गिकेमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्यांच्या एकूण क्षमतेत 20 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.