Ajit Pawar : 'बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का', अजित पवारांचा बोम्मईंवर हल्लाबोल
MVA Morcha in Mumbai : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे अस्मितेला धक्का लागला असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोम्मईंवर निशाणा साधला आहे.
MVA Morcha in Mumbai : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या वक्तव्यामुळे अस्मितेला धक्का लागला असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोम्मईंवर निशाणा साधला आहे. 17 डिसेंबरच्या महामोर्चासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल असं म्हणत महाविकास आघाडीकडून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
'बोम्मईची बैठकीत सामंजस्याची भूमिका'
दरम्यान, अजित पवार म्हणाले की, 'बोम्मई यांनी दिल्लीतील बैठकीत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी. जे ठरलंय त्याप्रमाणे बोम्मईंनी वागलं पाहिजे. राज्याच्या एकात्मतेला धक्का लागेल, असं आम्ही कधीच वागलो नाही. बोम्मईंनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं, तर हा वाद वाढला नसता. बोम्मईच्या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का लागला. त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं.'
मविआचा 17 डिसेंबरला विराट मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर भाजप नेत्यांकडूनही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. तसेच महापुरुषांचाही अपमान करणारी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली. या संदर्भात आक्रमक भूमिका घेत मविआकडून महामोर्चा पुकारण्यात आला आहे. यासंदर्भात आज मविआची महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या महामोर्चासाठी शिवसेना (ठाकरे गट ) राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे.
'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला'
अजित पवारांनी सांगितलं की, बुधवारी गृहमंत्र्यांनी बैठक बोलवली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. बोम्मई यांनी महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य केले नसते तर असे झाले नसतं. कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वाद निर्माण केला. यामुळे महाराष्ट्र सीमेवरील गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. सीमेवरील गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याचं मत व्यक्त केलं. ही भावना पण राज्याच्या दृष्टीने अडचण निर्माण करणारी आहे. कर्नाटकने समंजस भूमिका घेतली पाहिजे. दोन्ही बाजूंनी समजून घेणं गरजेचं आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबईत मविआचा महामोर्चा
मविआकडून रिचर्डसन क्रूडास मिल ते टाइम्स ऑफ इंडियापर्यंतच मोर्चा काढण्यात येणार आहे. मविआनं जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत परवानगी मागितली होती, पण पोलिसांची विनंती मान्य करत मविआकडून रिचर्डसन क्रूडास मिल ते टाइम्स ऑफ इंडियापर्यंतच काढण्यात येईल. मविआच्या महामोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा असून तेही मोर्चात सामील होणार आहेत.