नवी मुंबई, पनवेलमधील वायू प्रदूषण तिपटीने वाढलं; प्रदूषण पातळी 60 PM वरुन 200 PM वर
तुम्ही जर खारघर-तळोजा-पनवेल पट्ट्यातील रहिवासी असाल तर मॉर्निंग वॉक फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरु शकते. कारण हवेतील प्रदूषण तिपटीने वाढल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
नवी मुंबई : तुम्ही जर खारघर-तळोजा-पनवेल पट्ट्यातील रहिवासी असाल तर तुमचे मॉर्निंग वॉक तुम्हाला फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरु शकते. कारण हवेतील प्रदूषण पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने याचा परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वातावरण फाऊंडेशन या पर्यावरण संस्थेने गेल्या महिनाभर केलेल्या हवेच्या गुणवत्तेत प्रदूषण पातळी चक्क 60 पीएमवरुन 200 पीएमवर पोहोचली आहे. हवेतील प्रदूषण तिप्पटीने वाढल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
नवी मुंबई , पनवेल भागात गेल्या काही वर्षात हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे अनेक अहवालांमध्ये समोर आलं आहे. तळोजा एमआयडीसीमधील कंपन्यांमधून हवेत सोडले जाणारे विषारी गॅस, सुरु असलेलं नवीन बांधकाम, हायवेवरुन जाणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर आदी करणांमुळे प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर जाऊन पोहोचली आहे.
पर्यावरणावर काम करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनने एक महिनाभर हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर क्वॉलिटी मॉनिटर मशीन बसवल्या होत्या. 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. पनवेल, तळोजा एमआयडीसी, नावडे, खारघर सेक्टर 36, खारघर सेक्टर 7 या पाच ठिकाणी बसवलेल्या या मशीनमध्ये हवेची गुणवत्ता रोज तपासली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग महिनाभर तपासलेल्या हवेच्या गुणवत्तेत चक्क 200 पीएमपर्यंत प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली आहे.
60 पीएमच्या खाली हवेतील प्रदूषण पातळी असेल तर त्याचा शक्यतो परिणाम माणसाच्या शरीरावर होत नाही. मात्र तिप्पट प्रमाणात हवेतील प्रदषण वाढल्याचे केलेल्या तांत्रिक सर्वेतून समोर आले आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याने यावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत यासाठी प्रदूषण मंडळ आणि पनवेल मनपा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुनही कोणतीच कारवाई होत नसल्याची खंत वातावरण फाऊंडेशनने व्यक्त केली आहे.
कुठे किती प्रदूषण?
* पनवेल - 113.1 PM
* तळोजा एमआयडीसी - 197.4 PM
* नावडे - 130.5 PM
* खारघर सेक्टर 36 - 136.4 PM
* खारघर सेक्टर 7 - 128.3
रात्रीचा फायदा घेत तळोजा एमआयडीसीमधील काही कंपन्या विषारी वायू हवेत सोडत असतात. थंडीचे दिवस असल्याने वातावरणात सोडलेले विषारी वायू वर न जाता खालीच तरंगत राहतात. त्यामुळे पहाटेच्या वेळेस प्रदूषण पातळी ही उच्चतम स्तरावर पोहोचलेली निर्दशनास आली आहे. याचा परिणाम सकाळी मार्निंग वाँक करणाऱ्यांवर होणार असल्याची शक्यता वातावरण फाऊंडेशनने वर्तवली आहे. श्वसनाचा त्रास होणे, अस्थमा, स्मृतीभ्रंश, कॅन्सर, हार्ट अटॅकसारखे आजार यामुळे बळावू शकतात.
गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पहाटे उठून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येत या दिवसात भर पडलेली असते. सकाळचे धुके बघून मनाला प्रसन्न वाटत असले तरी ते धुके नसून प्रदूषणाचे कण असल्याचे लवकरच लक्षात आल्याने नागरिकांचा चांगलाच हिरमोड झालेला आहे. मॉर्निंग वॉक करताना लगेच थकवा जाणवत असून केमिकलयुक्त वास येत असल्याचे लोकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रदूषणात भर घालणाऱ्या कंपन्यांवर, कन्स्ट्रक्शन साईटवर, वाहनावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.