सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात दोन महिन्यानंतरही CBI च्या हाती काहीच नाही!
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात दोन महिन्यानंतरही CBI च्या हाती काहीच लागले नाही. मुंबई पोलिसांप्रमाणेच सुशांतचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाल्याचं सीबीआयने दोन महिन्यानंतर सांगितले आहे.
मुंबई : सुशांतच्या मृत्यूला चार महिने उलटले असून त्याच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी आलेल्या सीबीआयला तपासात काहीच निष्पन्न झालं नाही. त्यांच्याही हाती तेच लागलं जे मुंबई पोलिसांच्या हाती लागलं होतं. सुशांतने आत्महत्या केली हे मुंबई पोलिसांनी 2 दिवसात सांगितलं. मात्र, सीबीआयला तेच कारण सांगायला दोन महिने लागले. आता तर सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण गुलदस्त्यात पडलं आहे.
14 जून रोजी सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त करत सुशांत सिंगच्या कुटुंबाने प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. 18 ऑगस्टला प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. मात्र, दोन महिन्याच्या तपासानंतरही सीबीआयच्या हाती लागलं ते शून्य. सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली होती. फॉरेन्सिकचा रिपोर्ट, पोस्टमार्टमचा अहवाल हे सगळ मुंबईत पोलिसांकडे पुराव्यानिशी उपलब्ध होते. तरीही मुंबई पोलीस आणि त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.
सुशांतवर बनणाऱ्या प्रस्तावित चित्रपटांना ब्रेक; आता आधी कुटुंबियांची परवानगी घ्यावी लागणार
नेमका कुठल्या दिशेने होता मुंबई पोलिसांचा तपास?
- सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली सगळ्यात पहिले याचे उत्तर मुंबई पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली.
- ज्याच्या मध्ये सुशांतने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालं.
- पोस्टमार्टमचा अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट या सगळ्यांनी सुशांतने आत्महत्या केली या कारणाला दुजोरा दिला.
- त्यानंतर नेमकं सुशांतच्या आत्महत्ये मागचं कारण काय याचे उत्तर शोधण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केली. ज्यासाठी 56 लोकांचे जबाबसुद्धा मुंबई पोलिसांनी नोंदवले.
- तर सुशांतच्या कुटुंबियांनी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर असमाधान व्यक्त करत बिहारमध्ये गुन्हा नोंदवला.
- आणि मग एन्ट्री झाली बिहार पोलिसांची, मुंबई पोलिसांना विश्वासात न घेता आपला तपास सुरू केला.
- बिहारमध्ये गुन्ह्याची नोंद झाली असली तरी ज्या ठिकणी घटना घडली त्या स्थानिक यंत्रणेकडे तो गुन्हा वर्ग करण्यात येतो. मात्र, बिहार पोलिसांनी तसं न करता थेट सीबीआय'कडे गुन्हा सोपवला.
- 18 ऑगस्ट रोजी सीबीआई कडे तपास सोपवण्यात आला आणि 19 ऑगस्टला सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम मुंबईमध्ये सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी दाखल झाली. सुशांत सिंगचा मृत्यू नेमका कसा झाला यापासून सीबीआयने आपल्या तपासाची सुरुवात केली.
- सर्वात आधी सुशांतच्या घरीच राहणारा सिद्धार्थ पीठाने, दीपेश सावंत यांचे जबाब नोंदवले गेले. 2 वेळा घटनास्थळाचं नाट्य रूपांतर करण्यात आलं.
- एम्सच्या फॉरेन्सिक टीमकडून सुशांतची व्हिसेराची तपासणी पुन्हा करण्यात आली.
- 40 पेक्षा अधिक लोकांचे जबाब सीबीआयकडून नोंदवण्यात आले.
- एम्सचा फोरेन्सिक रिपोर्ट आला ज्यामध्ये सुशांतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आणि मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने असल्याचाही दुजोरा या रिपोर्टमुळे मिळाला.