एक्स्प्लोर
तब्बल सहा महिन्यांनंतर घाटकोपर विमान दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
गेल्या वर्षी 28 जून रोजी घाटकोपरमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अखेर या घटनेप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मुंबई : गेल्या वर्षी 28 जून रोजी घाटकोपरमध्ये एक चार्टर्ड विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अखेर या घटनेप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यू वाय एव्हीएशन कंपनी, विमानाचे स्पेअर पार्ट पुरवणाऱ्या कंपनीचा अधिकारी अजय अग्रवाल, इंदमार एव्हीएशन कांपनीचे अधिकारी तसेच विना परवाना टेस्ट फ्लाईट करणाऱ्या यंत्रणेचे अधिकारी यांच्याविरोधात घटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर "आता आम्हला न्याय मिळू शकेल", अशी प्रतिक्रिया या दुर्घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
चाचणी करण्यासाठी विमानाने उड्डाण घेतले होते. परंतु चाचणीसाठी हवामान योग्य नसल्याचा आरोप दुर्घटनाग्रस्त विमानातील मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. तर हे विमान हे भंगारामधून खरेदी केले होते. त्याची दुरुस्ती करून त्याचे उड्डाण केले, त्यामुळे हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. तसेच या विमानाच्या उड्डाणाला डीजीसीआयची परवानगीदेखील नव्हती, असा अहवाल खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय संसदीय समितीच्या वतीने सादर करण्यात आला होता.
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात 28 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास एक चार्टर्ड विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील चार जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. पायलट मारिया झुबेरी, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडीत यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
हे विमान उत्तर प्रदेश सरकारचे होते. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान 2014 मध्ये मुंबईतील यू वाय एव्हिएशनला विकले. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त झाले. चाचणीसाठी जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झाले आणि भर वस्तीत कोसळले.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















