(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EDची छापेमारी अनिल देशमुखांच्या घरी, चिंता वाढली शिवसेनेची!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या ईडीच्या रडारवर असून त्यांच्या निवासस्थानी EDने धाड टाकल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र एकीकडे अनिल देशमुख यांच्या घरावर EDने टाकलेल्या धाडीमुळे ठाकरे सरकार अडचणीत आले असतानाच आता शिवसेनेच्या नेत्यांची देखील धाकधूक वाढली आहे.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सध्या ईडीच्या रडारवर असून त्यांच्या निवासस्थानी EDने धाड टाकल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र एकीकडे अनिल देशमुख यांच्या घरावर EDने टाकलेल्या धाडीमुळे ठाकरे सरकार अडचणीत आले असतानाच आता शिवसेनेच्या नेत्यांची देखील धाकधूक वाढली आहे. सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील उल्लेख केल्यामुळे आधीच ते अडचणीत आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांनंतर आपला तर नंबर लागणार नाही याची चिंता आता ईडीच्या रडारवर असलेल्या त्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे.
शिवसेनेचे हे नेते EDच्या रडावर
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यापूर्वी 'ईडी'नं संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत थेट विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नसल्याने ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे म्हटले होते. मात्र आता राज्यात पुन्हा ईडी सक्रीय झाल्याने पुन्हा एकदा त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर संजय राऊत यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब तसेच आधीपासून ईडीच्या रडारवर असलेले प्रताप सरनाईक हे देखील सध्या ईडीच्या कारवाईमुळे चिंतेत असल्याची माहिती मिळत आहे. तर भविष्यात आणखी देखील शिवसेनेचे नेते ईडीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सरनाईकांनी मांडली व्यथा
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आपली हतबलता बोलून दाखवली होती. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल असे सरनाईक आपल्या पत्रात म्हणाले होते.