दिराचा भावजयीवर अॅसिड हल्ला, मुंबईतील घाटकोपरमधील खळबळजनक घटना
मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या चेहऱ्यावर तिच्या दिरानं अॅसिड फेकलं आहे.
मुंबई: मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेच्या चेहऱ्यावर तिच्या दिरानं अॅसिड फेकलं आहे. या घटनेत महिलेचा चेहरा जळाला असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी सांगितलं की बुधवारी सायंकाळी घाटकोपरमधील परशीवाडी परिसरात मुनीर बशीर घासवाला चाळीमध्ये ही घटना घडली. प्रबुद्ध कांबळे असं आरोपीचं नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार पीडित महिला ही विधवा आहे आणि कुटुंब चालवण्यासाठी ती नोकरी शोधत होती. त्यावेळी तिला तिच्या शेजारी राहणाऱ्या सोनाराने तिला आपल्या दुकानावर नोकरी दिली. हे महिलेचा दीर असलेल्या प्रबुद्धला आवडलं नाही. त्यानं रागात दुकानात जात त्या महिलेच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला केला. ट
घाटकोपरच्या पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी दुकानाचा मालक सुधांशु प्रामाणिक तिथं उपस्थित होता. या हल्ल्यात त्याचाही हात आणि चेहरा भाजला आहे. घटनेनंतर दोघांनाही जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. दोघांवर तिथं उपचार सुरु असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रबुद्ध कांबळेला अटक करण्यात आली आहे.