ABP Majha Exclusive : कोविडचे दुर्मिळ दुष्परिणाम; किडनीची कार्यक्षमता 90 टक्क्याने मंदावली!
Exclusive : कोरोना बरा झाल्यानंतर अनेक दुष्परिणाम होत असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता नवे दुष्परिणाम समोर आले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर एका रुग्णाच्या किडनीची कार्यक्षमता 90 टक्क्याने मंदावली आहे
मुंबई : गेल्या काही महिन्यांत कोविड बरा झाल्यानंतरचे दुष्परिणाम काही लोकांना जाणवत आहेत. ते परिणाम इतके भयानक आहेत की, काही रुग्णांना बरे होण्याकरता 3-4 महिने जात आहेत. काहींना अनेक महिने ऑक्सिजन द्यावा लागत आहे, तर काही व्यक्तींना दैनंदिन काम करण्यास अडथळे येत असून काहींना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या दुष्परिणामानंतर हर्ष सोळंकी या 20 वर्षीय तरुणाची कोविडच्या उपचारानंतर किडनी सध्या 10 टक्के कार्यक्षम असून ती वाचविण्याकरिता डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. अशा पद्धतीने कोविडच्या उपचारानंतर किडनी अशा पद्धतीने कार्य करत नसल्याची पहिली घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून या संदर्भात लवकरच ते मेडिकल जरनलमध्ये या अनुषंगाने संशोधन पेपर प्रसिद्ध करणार आहे.
हर्षला लहानपणापासून असणाऱ्या किडनी विकारामुळे त्रस्त होता, सहा वर्षांपूर्वीच त्याच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याकरिता त्याच्याच वडिलांनी किडनी दिली होती. हर्ष हा व्यवस्थापन या विषयात अभ्यास करत असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तो राहत असलेल्या हॉस्टेलवरून घाटकोपर येथील घरी आला. हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांना कोविडची होती. घरी आल्यानंतर 10 दिवसाने हर्षची चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र फारशी लक्षणे नसल्यामुळे घरी त्याने विलगीकरण करून उपचार घेतले. त्याची काही दिवसांतच औषधे घेतल्यानंतर तब्बेत सुधारली आणि व्यवथित होता.
मात्र कोविडच्या उपचारातून बरे झाल्यानंतर, किडनीच्या दैनंदिन तपासाकरिता गेल्यानंतर किडनीच्या तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्यांचे निकाल पाहून डॉक्टर आणि हर्ष आणि हर्षच्या कुटुंबियांना धक्काच बसला. कारण त्या चाचण्यांच्या अहवालनानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. क्रियाटनिनची पातळी वाढली होती. त्यानंतर किडनीची बायोप्सी करण्यात आली, यामध्ये किडनी 'रिजेक्शन' दाखविण्यात आले. कोविड होईपर्यंत हर्षची तब्बेत अगदी चांगली होती. मात्र किडनीच्या कार्यक्षमतेत अशापद्धतीने अचानक बदल झाल्याने सर्वाना आश्चर्यच धक्का बसला आहे.
याप्रकरणी, हर्षवर उपचार करणारे हिंदुजा रुग्णालयातील मूत्रपिंडविकार तज्ञ डॉ. जतीन कोठारी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "आमच्यासाठी सुद्धा हे आव्हानात्मक प्रकरण आहे. कारण अशा पद्धतीची केस कुठेच झालेली नाही. कोविडच्या उपचारानंतर किडनीची कार्यक्षमता इतक्या प्रमाणत कमी झाल्याचे हे पहिले उदाहरण आहे. त्यामुळे ही केस आम्ही संशोधन पेपर म्हणून सादर करणार आहोत. अमेरिकेतील एका माझ्या सहकारी मित्रांना ही केस पाठविण्यात आली आहे. मात्र त्यांच्या कुणाच्या निदर्शनास असा काही प्रकार ऐकवीत नसल्याचे सांगण्यात आले. हर्षचे लघवी होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सध्या त्याच्या शरीरातील निकामी पदार्थ प्लास्माफेरेसिस या वैद्यकीय प्रक्रियेच्या साहाय्याने बाहेर काढून टाकण्यात येत आहे. त्याच्यावर अद्याप डायलेसिस चालू करण्यात आलेलं नाही. त्याची सध्या 10 टक्के किडनी कार्यरत आहे. जर या प्लास्माफेरेसिस प्रक्रियेत यश आले नाही तर आम्हला येत्या 15 दिवसांत त्याच्यावर डायलेसिस चालू करावे लागणार आहे. "
(रूग्णाचे नाव बदलण्यात आले आहे.)