आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, मुंबईतील लोअर परेल उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद
मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.
मुंबई : डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे (Delisle Bridge Lower Parel) उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल (FIR against Aaditya Thackeray) करण्यात आला आहे. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. या विरोधात आता मुंबई महापालिका (BMC) अॅक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळतेय.
डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले होतं. असं असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.
राजकीय हेतूने प्रेरित होऊन गुन्हा दाखल : संजय राऊत
आदित्य ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. बेकायदेशीर सरकार स्थापन झालंय त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल होत नाही. राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
लोकांच्या हितासाठी निर्णय घेतला
डिलाई रोड ब्रिजचे काम नवरात्रीपर्यंत पूर्ण करणार असे सांगितले होते मग का झाल नाही? असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे. लोकांचा जीवाला धोका निर्माण होईल अशी केस केली आहे. कोणाच्या दबावाखाली केस केली हे उघड होणारच आहे. बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे, लोकांच्या हितासाठी केसेस घ्या, लोकांच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. कितीही केसेस करा, लोकांच्या हितासाठी आम्ही काम करत राहणार असे सचिन अहिर म्हणाले.
सचिन अहिर म्हणाले, आमच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मी दोष देणार नाही. त्यांनाही माहीत आहे त्रास होतो आहे. वरळी मतदार संघात आम्ही आलो आणि विकासकामे करतोय हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय.
हे ही वाचा :