Barge P-305 वरील शोध आणि बचावकार्य सुरुच; 37 जणांचा मृत्यू, मुंबईत एडीआर दाखल
बार्ज P-305 वरील 37 जणांचा मृत्यू झाला आहे. नौदलाकडून 38 बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. या प्रकरणी मुंबईतील यलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रात अडकलेल्या बार्ज P-305 वरील 37 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 38 बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. बार्ज P-305 वरील कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी मुंबईतील यलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. बार्ज P-305 वर एकूण 261 कर्मचारी होते. त्यापैकी 186 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली.
ओएनजीसीसाठी काम करणारं बार्ज P-305 तोक्ते चक्रीवादळामुळे भरकटलं होतं. यावर अनेक कर्मचारी काम करत होते. आतापर्यंत 186 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तर 37 मृतदेह हाती लागले आहे. हवामान विभागाने तोक्ते चक्रीवादळाचा इशारा तीन दिवसांपूर्वीच दिला असताना ओएनजीसीने निष्काळजीपणा का केला, असा प्रश्न राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी विचारला आहे.
नवाब मलिक यांचं ओएनजीसीच्या निष्काळजीपणावर बोट
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, "हवामान विभागाने वादळ येण्याच्या तीन दिवसांपूर्वीच इशारा दिला होता. ओएनजीसीची जबाबदारी होती, पण त्यांनी इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. ओएनजीसी आणि एफकॉन्स एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण एक तपास समिती पुरेशी नाही. जबाबदारी ठरवून दोषींना शिक्षा द्यावी लागेल."
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी यलोगेट पोलिसांकडून तपास सुरु
मुंबईच्या यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बार्ज P-305 वरील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर हा एडीआर दाखल झाला आहे. यलोगेट पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
नौदलाकडून शोध आणि बचावकार्य सुरुच
बार्ज P-305 वरील शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतीय नौदल बार्ज P-305 वरील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. ज्यांना वाचवलं आहे, त्यांना मुंबईत आणलं आहे. आयएनएस कोलकातामधून बचावलेले कर्मचारी परतले आहेत. तर मृतदेह देखील याच युद्धनौकेतून मुंबईच्या बंदरावर आणले. यासोबतच आयएनएस कोची पुन्हा एका शोध आणि बचाव कार्यात सहभागी झाली आहे. भारतीय नौदल युद्धनौका, विमान आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. तटरक्षक दलही या शोधमोहिमेद सहभागी झालं आहे.