मुंबईत घरकाम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या
जोगेश्वरीमध्ये घरकाम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. ज्योती पाटेकर असं मृत तरुणीचं नाव आहे. जोगेश्वरीमधील ओबेरॉय स्प्लेन्डर कॉम्प्लेक्समधील ही घटना आहे.
मुंबई : जोगेश्वरीमध्ये घरकाम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. ज्योती पाटेकर असं मृत तरुणीचं नाव आहे. जोगेश्वरीमधील ओबेरॉय स्प्लेन्डर कॉम्प्लेक्समधील ही घटना आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र ज्योतीच्या आत्महत्येबद्दल तिच्या कुटुंबीयांनी आणि इमारतीत घरकाम करणाऱ्या इतर महिलांनी संशय व्यक्त केला आहे.
ज्योतीच्या मृत्यूची चौकशी व्हावी या मागणीसाठी मेघवाडी पोलिस स्टेशनबाहेर घरकाम करणाऱ्या महिलांनी घोषणाबाजी केली. याआधीही ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये एका मुलीची हत्या करून तिला इमारतीवरून खाली फेकण्यात आलं होतं. तेव्हा ते प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप या महिलांना केला आहे. मात्र यावेळी ज्योतीला न्याय दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निश्चय या महिलांनी केला आहे.
ज्योती बँक अधिकारी नितीन खन्ना यांच्या घरी गेल्या दीड वर्षापासून 24 तास मोलकरीण म्हणून काम करत होती. मात्र खन्ना यांची पत्नी ज्योतीचा छळ करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून ज्योतीला तिचा पगारही दिला नव्हता.
खन्ना यांच्या मुलीचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी चांदीचे शिक्के आणले होते. त्यातील काही शिक्के हरवल्याने खन्ना कुटुंबातील काही सदस्य तिला ओरडले होते. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.