अकरावी प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्यातूही अर्ज करण्याची संधी मिळणार
11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. त्यासोबतच या विध्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसल्यास पालकांचे हमीपत्र स्वीकारले जाणार आहे.
मुंबई : मराठा आरक्षण कोर्टाने वैध ठरवल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खुल्या प्रवर्गातून ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुन्हा एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग) आणि ईडब्लूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गामधून अर्ज करण्याची संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
एसईबीसी प्रवर्गात 34,251 राखीव जागांपैकी 4557, तर ईडब्लूएस प्रवर्गात 28,636 जागांपैकी 2600 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रवर्गातील जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहण्याची शक्यता असल्याने त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलून अर्ज करण्याची मुभा दिली आहे.
आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग- 1 आणि भाग- 2 नोंदणीसाठी 4 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एसईबीसी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि ईडब्लूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पनाचे प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसल्यास पालकांचे हमीपत्र स्वीकारले जाणार आहे. मात्र याबाबत हमीपत्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी दाखल करणे गरजेचे आहे. यानंतर 12 जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
शासन निर्णयात अकरावी प्रवेशासाठी एसईबीसी प्रवर्गासाठी 16 टक्के आणि ईडब्लूएस प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद आहे. माभ काल (27 जून) उच्च न्यायालयाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षण वैध ठरवत त्यांना शिक्षणात 12 टक्के आरक्षण मंजूर केलं आहे.