Nagpur News : वर्षभरात प्यायले लाखोंचे पाणी! मनपाने पाठविले देयक, तक्रारीनंतरही केले दुर्लक्ष
देयक अचानक वाढल्याने त्यांनी याबाबतची तक्रार कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) यांच्याकडे केली. यानंतरही त्यांना विभागाकडून पाण्याचे मीटर योग्य असल्याचे सांगून जबाबदारी झटकली गेली.
नागपूरः शहरात 24 तास पाणी पुरवठा करण्याचा गाजावाजा ओसीडब्लू आणि नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात येते. मात्र शहराच्या कोणत्या भागात हा पुरवठा आहे हे संशोधनाचे विषय. मात्र एका व्यक्तीला वर्षभरासाठी 1 लाख रुपयाचे देयक पाठविल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पाणी देयकावरून नागपुरकर मनपाच्या नावाने बोट मोडत असतानाच, अचानक लाखो रुपयाचे बिल हातात पडल्याने मालमत्ताधारकाने कपाळावर हात मारून घेतले.
भंडारा मार्गावरील देशपांडे लेआऊट येथील निवासी सत्यनारायण मालू यांना 2021 पूर्वी तीन महिन्यांचे देयक 800 ते 1000 रुपये यायचे. मात्र अचानक एक वर्षासाठीचे 1 लाख देयक देण्यात आले आहे. मार्च 2021मध्ये त्यांच्याकडे जबरदस्तीने नवा मीटर लावण्यात आला. एप्रिल 2021 ते जन 2021 मध्ये मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून 7055 रुपयाचे देयक पाठविण्यात आले. देयक अचानक वाढल्याने त्यांनी याबाबतची तक्रार कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) यांच्याकडे केली. यानंतरही त्यांना विभागाकडून पाण्याचे मीटर योग्य असल्याचे सांगून जबाबदारी झटकली गेली. शहरात 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. परंतु, अद्यापही 24 तासात तासही पाणी मिळत नाही. परंतु नवे पाण्याचे मिटर हवेमुळे 24 तास अखंडीतपणे फिरत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतो.
शेजाऱ्याला कमी देयक
पाण्याच्या बिलाची प्रत्येक महिन्यात वापर नोंदणी घेणे आवश्यक होते. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मालू यांच्या शेजारी राहणाऱ्या ग्राहकास 3 महिन्यासाठी 5077 रुपये देयक पाठविण्यात आले. यानुसार त्यांना प्रतिमहिना सरासरी 1700 एवढे देयक पडले. माल व त्यांच्या शेजाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या सारखीच आहे, हे विशेष. त्यामुळे पाण्याचा वापरही जवळपास सारखाच असल्याची जादा शक्यता आहे. त्यानंतरही तक्रारकर्ते मालू यांना प्रतिमहिना 8000 रुपये बील पाठविण्यात आले. एवढ्या रक्केम महिन्याला 10 खासगी टॅंकर पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे घरात राहणारे 9 सदस्य एका महिन्यात 10 टँकर पाणी कसे काय पिऊ शकतात? असा सवाल मालू यांनी विचारला आहे.